नाशिक / मुंबई : त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याच्या प्रकाराची अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केल्यानंतर काही तासांतच पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, रविवारी पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकीत दोन्ही गटांची समजूत काढून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या प्रकरणाला आता राजकीय रंग मिळाल्याने त्याचा परिणाम त्र्यंबकच्या सामाजिक एकोप्यावर होऊ शकतो, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्र्यंबकमध्ये शनिवारी रात्री निघालेल्या संदल मिरवणुकीतील काही युवकांनी त्र्यंबकेश्वर मंदिलाच्या प्रवेशद्वाराजवळ फुले वाहून पायरीजवळ धूप दाखवण्यासाठी आग्रह धरला. त्याला प्रवेशद्वाराच्या सुरक्षारक्षकांनी आक्षेप घेतला. गोंधळ सुरू झाल्यानंतर देवस्थान समितीनेही तेथे धाव घेतली. काही वेळाने मिरवणूक निघून गेली. मात्र, ‘मंदिरात हिंदू धर्मियांशिवाय कुणालाही प्रवेश नाही’ याचा संदर्भ देऊन देवस्थानने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पोलिसांकडे केली. दरम्यानच्या काळात संबंधित चित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने या प्रकरणाचे गांभिर्य वाढले. पोलिसांनी रविवारी शांतता समितीची बैठक बोलावून दोन्ही गटांना समज देत हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यात हे प्रकरण निवळेल, अशी चिन्हे असतानाच आता याला राजकीय वळण लागले आहे.

कथित घटनेसंदर्भात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवून कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करुन चौकशी करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले. त्यांनी अनेकांशी संवाद साधून चर्चा केली आणि चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. मंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न, धूप, आरती व फुले वाहून हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावून सामाजिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

 ‘पायरीजवळ धूप दाखवणे दरवर्षीचे’

ज्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे डोक्यावर चादर धरून संदल मिरवणूक निघाली होती, त्या सलीम सय्यद यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे सर्व नियम लहानपणापासून ज्ञात असल्याचे नमूद केले. ‘माझे वडील मिरवणुकीवेळी पायरीजवळ धूप दाखवून निघून जात असत. आजवर मीही तसे केले होते. यावेळी मात्र त्यास वेगळे वळण मिळाले. शनिवारी कुणाचाही मंदिरात प्रवेश करण्याचा वा चादर चढविण्याचा उद्देश नव्हता,’ असे सय्यद यांनी म्हटले. शांतता समितीचे सदस्य नबीयून शेख यांनी स्थानिक पातळीवर हिंदू-मुस्लिम गुण्यागोविदांने राहत असल्याचे नमूद केले. संदलवेळची प्रथा बंद करण्याबाबत लेखी देण्याचीही तयारी संबंधित युवकांनी दर्शविली.

 भाविकांच्या संख्येवर परिणामाची भीती  

त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. शनिवार, रविवार आणि सोमवारी ३० ते ५० हजारच्या दरम्यान गर्दी असते. त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे साडेपाचपासून रात्री नऊपर्यंत दर्शनासाठी खुले असते. उपरोक्त तीन दिवशी रांगेतून दर्शनासाठी तीन ते पाच तास लागतात. तुलनेत लवकर दर्शन होण्यासाठी देवस्थानचा प्रति व्यक्ती २०० रुपयांच्या देणगी दर्शनाचा पर्याय आहे. शनिवारच्या घटनेचा विपर्यास झाल्यामुळे सर्वत्र वेगळा संदेश गेल्याची काहींची भावना आहे. त्याचा भाविकांच्या संख्येवर परिणाम होऊ शकतो, अशी त्यांना साशंकता वाटते.

‘यापूर्वी असे घडले नाही’ देवस्थानचे प्रमुख पुजारी तसेच विश्वस्त डॉ. सत्यप्रिय शुक्ल यांनी दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना घडू नयेत, अशी मागणी केली.  तर त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष आणि देवस्थानचे विश्वस्त प्रशांत गायधनी यांनी ‘आजवर असा प्रकार घडला नव्हता’ असे मत मांडले.  सुमारे १२ हजार लोकसंख्येच्या त्र्यंबकेश्वर गावात सर्व धर्मियांमध्ये सलोख्याचे संबंध आहेत. पूजा साहित्य, नारायण नागबली विधीसाठी लागणारे कपडे, प्रसाद, भांडी विक्रीची अल्पसंख्यांकांची दुकाने आहेत. दरवर्षी त्यांच्याकडून दोन ते तीन वेळा संदल, उरुस काढला जातो. मात्र यापूर्वी कधीही असा प्रकार घडला नव्हता, असे ते म्हणाले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sit investigation in trimbakeshwar temple entry case case against four ysh
First published on: 17-05-2023 at 00:02 IST