प्रशासकीय अनास्थेमुळे मनपाचे नुकसान झाल्याचा आक्षेप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक: शहरात सुमारे १६८ झोपडपट्टय़ा असून तिथे प्राथमिक सुविधेची कामे करण्यासाठी प्रशासन अधिकृत आणि अनधिकृतचा निकष लावते. काही खासगी जागेवरील झोपडपट्टय़ांना घरपट्टी, सेवा शुल्काची आकारणी केली जाते. तथापि अनेक झोपडपट्टय़ांना रहिवाश्यांनी पाठपुरावा करूनही ती लागू केली जात नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. यावर प्रशासनाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. या संदर्भात लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे. सर्वसाधारण सभेत चंद्रकांत खाडे यांनी प्रभाग २७ मधील अण्णाभाऊ साठेनगर वसाहतीचा विषय मांडला. शहरातील १६८ पैकी ५६ अधिकृत तर उर्वरित ११२ झोपडपट्टय़ा अनधिकृत असल्याची आकडेवारी प्रशासनाकडून उपलब्ध झाली. १९९२ पूर्वीची साठेनगर झोपडपट्टी असून हातावर पोट भरणारे नागरिक तिथे वास्तव्य करतात. ही अधिकृत झोपडपट्टी असल्याचे जुने संदर्भ त्यांनी मांडले. आजवर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र ती अनधिकृत असल्याचे सांगून नागरी सुविधेची कामे करण्यास नकार दिल्याकडे खाडे यांनी लक्ष वेधले. शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी राजीवनगरच्या खासगी जागेवरील झोपडपट्टीतील रहिवाशांना घरपट्टी लागू केल्याकडे लक्ष वेधले. काही झोपडपट्टीत ती लागू केली जाते, काही ठिकाणी ती लागू केली जात नाही. यामुळे मनपाचे नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर प्रशासनाकडून प्रस्ताव प्राप्त होताच त्यानुसार घरपट्टी, सेवाशुल्क लागू केले जात असल्याचा दावा केला गेला. यावर बडगुजर यांनी आक्षेप घेतला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slums city homeless administrative corporate loss ysh
First published on: 14-01-2022 at 01:40 IST