विधान परिषद निवडणुकीमुळे महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम निरुत्साहात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक :  महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिवस मंगळवारी शहर परिसरात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत वीरपत्नींना स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले. विधान परिषद निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेसचा अपवाद वगळता इतर पक्षांमध्ये फारसा उत्साह दिसला नाही.

पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन झाले. सोहळ्यास विभागीय आयुक्त राजाराम माने, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, पोलीस अधीक्षक संजय दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते आदी उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी नागरिकांना महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी दिमाखदार संचलन झाले. संचलनाने ध्वजास वंदन करण्यात आले. संचलनाचे नेतृत्व सहायक पोलीस आयुक्त विजय चव्हाण यांनी केले. संचलनात महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी, आयुक्तालय, अधीक्षक कार्यालय, गृहरक्षक दल, वन विभाग, अग्निशमन दल, शहर वाहतूक शाखेच्या पथकांनी सहभाग घेतला. तसेच जलद प्रतिसाद पथक, पर्यटन पोलीस, दंगा नियंत्रण पथक, वज्र, वरुण, वन्य प्राणी बचाव पथक, १०८ रुग्णवाहिका आदी वाहनांनी संचलनात सहभाग नोंदविला. चित्ररथांच्या माध्यमातून मतदार नोंदणी, रस्ता सुरक्षेचा संदेश देण्यात आला.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेंतर्गत वीरपत्नी कमल वसंत लहाने, कांचन सुरेंद्र नवगिरे, रेखा एकनाथ खैरनार आणि सुरेखा सुरेश सोनवणे यांना स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले. नाशिक उपविभागातील तलाठी व्ही. एस. काळे यांना उत्कृष्ट तलाठी पुरस्काराने गौरविण्यात आले.

राजकीय पक्षांमध्ये निरुत्साह

विधान परिषद निवडणुकीच्या धामधुमीत काँग्रेस वगळता अन्य राजकीय पक्षांनी महाराष्ट्र दिन साजरा करण्यास उत्साह दाखवला नाही. काँग्रेस पक्ष कार्यालयात महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष शरद आहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, हेमलता पाटील आदी उपस्थित होते. सध्या मुख्यमंत्री अधिकाधिक सरकारी योजना, उद्योग, प्रकल्प, रस्ते आदी विदर्भात नेऊन उर्वरित महाराष्ट्रावर अन्याय करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

इतकेच नव्हे तर सत्ताधाऱ्यांकडून वेगळ्या विदर्भाचा डाव रचला जात असल्याची साशंकता व्यक्त करण्यात आली. काँग्रेस महाराष्ट्राचे कदापि तुकडे होऊ देणार नाही, असा निर्धार आहेर यांनी व्यक्त केला.

मराठी भूमिपुत्राच्या हक्कासाठी लढणाऱ्या मनसेच्या वतीने स्थानिक पातळीवर काही विशेष कार्यक्रम झाला नाही.

स्थानिक पदाधिकारी मुंबईत हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यासाठी गेले होते. नंतर ते राज ठाकरे यांच्या सभेस उपस्थित राहिले.

स्थानिक पातळीवर काही वेगळे नियोजन केले नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी मान्य केले.

शिवसेना कार्यालयात वेगळी स्थिती नव्हती. भाजप कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रम झाल्याचे शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart card distribution to martyr wife in nashik district
First published on: 03-05-2018 at 03:04 IST