लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: वनविभागाच्या रावेर वनपरिक्षेत्रातील चोरवड सीमा तपासणी नाक्यावर मध्यरात्री विनापरवाना १८ हजारांचे वीस घनमीटर जळाऊ लाकूड व पाच लाख रुपये किमतीची मालमोटार, असा सुमारे पाच लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यावलचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांना लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने मध्य प्रदेश-महाराष्ट्राच्या चोरवड सीमा तपासणी नाक्यावर पहाटे अडीचच्या सुमारास मालमोटार तपासणीसाठी उभी केली.
हेही वाचा… जळगाव: पाणी पुरवठा मंत्र्यांच्या मतदारसंघातील नशिराबादेत टंचाई; राष्ट्रवादीचा घागर मोर्चा
मालमाटोरीची अहिरवाडीचे वनरक्षक रवींद्र भुतेकर, गोविंदा मराठे, राजू तडवी यांनी झडती घेतली. त्यात विनापरवाना सुमारे १८ हजार ७० रुपये किमतीचे २० घनमीटर जळाऊ लाकूड आढळून आले. त्यामुळे लाकडासह पाच लाख रुपये किमतीच्या मालमोटारीसह मुद्देमाल रावेर वनक्षेत्रीय अधिकारी अजय बावणे यांनी जप्त केले. भुतेकर यांच्या फिर्यादीवरून रावेर वनपरिक्षेत्रात संशयित शेख तन्वीर शेख निसार (३२, रा. चोपडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.