लासलगावमधील  कृषीपंपधारकांना लाभ होणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘महावितरण’च्या जागेवर उभारलेला राज्यातील सर्वाधिक १.३ मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प लासलगाव येथे कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पातून उत्पादित होणारी आणि ग्रीडमार्फत पुरविली जाणारी अशी एकत्रित वीज दिवसा कृषिपंपांना दिली जाणार आहे. ५०० ते ६०० कृषिपंपधारकांना याचा लाभ होणार असून जिल्ह्य़ात सध्या तीन सौर ऊर्जा प्रकल्पामधून तीन मेगावॉटपेक्षा अधिक वीजनिर्मिती केली जात आहे. मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांच्या उपस्थितीत हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला.

कृषिपंपांना रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केला जात असल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, अशी मागणी प्रदीर्घ काळापासून होत आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी सरकार आणि ‘महावितरण’ उपाय योजना करत आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत ‘महावितरण’च्या जागेत लासलगाव येथे हा प्रकल्प उभारण्यात आला. ‘महावितरण’कडून वितरित होणाऱ्या एकूण वीज वापरापैकी सुमारे ३० टक्के वीज ही कृषीपंपासाठी वापरली जाते. सध्या कृषिपंपांना चक्राकार पद्धतीने दिवसा आठ, तर रात्री १० तास वीजपुरवठा होतो.

दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हाती घेतली. महानिर्मिती, महाऊर्जा यांच्यातर्फे सार्वजनिक आणि खासगी सहकार्यातून कृषिपंप वापर अधिक असलेल्या परिसरात हे प्रकल्प उभे राहत आहेत. त्यामध्ये सरकारी, गावठाण, शेतकऱ्यांच्या खडकाळ-पडीक जमिनींचा समावेश आहे. महावितरणचे उपकेंद्र तसेच इतर ठिकाणी असलेल्या जागेचाही प्रकल्पासाठी उपयोग केला जात आहे.

परिमंडळात ५.३६ मेगावॉट सौर ऊर्जा

लासलगाव उपकेंद्र परिसरात जवळपास २० हजार चौरस मीटर जागेवर हा प्रकल्प उभारला गेला आहे. १.३ मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. यापूर्वी वावी येथे ०.७३ मेगावॉट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सप्टेंबर १८ मध्ये कार्यान्वित झाला. वणी येथील ०.९९ मेगावॉट क्षमतेचा प्रकल्प मे २०१९ च्या प्रारंभी सुरू झाला आहे. तसेच गिरणारे उपकेंद्र परिसरात ०.७९ मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच वीज निर्मिती अपेक्षित आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर विभागात आश्वी खुर्द आणि कोळपेवाडी येथे प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर नाशिक परिमंडळात महावितरणच्या स्वमालकीच्या जागेतील प्रकल्पातून ५.३६ मेगावॉट सौर ऊर्जा वापरात येईल. प्रकल्प परिसरात कृषिपंपांचा भार १५.६५ च्यादरम्यान आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solar power project has the highest potential of mahavitaran
First published on: 17-05-2019 at 00:33 IST