विधिमंडळातील रमी प्रकरणामुळे कृषी खाते सोडावे लागलेले राष्ट्रवादीचे (अजित पवार) मंत्री माणिक कोकाटे आता त्यांना मिळालेल्या क्रीडा खात्यात चांगलेच रमले आहेत. शेताच्या बांधावरुन थेट क्रीडांगणावर उतरलेले माणिक कोकाटे आता प्रत्येक कार्यक्रमात मागील सर्वकाही विसरण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे, खेळ, खेळाडू आणि त्यांच्या समस्या याव्यतिरिक्त इतर विषयांवर बोलणे ते टाळू लागले आहेत. नाशिक येथील खो-खो प्रबोधिनीच्या कार्यक्रमातही उपस्थितांना तसाच अनुभव आला.
जिल्ह्यातील आदिवासी भागातील खेळाडू हेरुन त्यांना खो-खो खेळाचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण नाशिक येथील खो-खो प्रबोधिनीच्या वतीने देण्यात येते. ही प्रबोधिनी निवासी असल्याने प्रबोधिनीत निवड झालेल्या खेळाडूंच्या शिक्षणाची व्यवस्थाही प्रबोधिनीमार्फेत केली जाते. प्रबोधिनीच्या अनेक खेळाडूंनी राज्, राष्ट्रीय पातळीवर बक्षिसे मिळवली आहेत. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून आवर्जून वेळ काढून क्रीडामंत्री माणिक कोकाटे यांनी नाशिक येथील खो- खो प्रबोधिनीच्या खेळाडूंशी हितगुज केले.
मागील वर्षातील आपल्या कामगिरीचा अहवाल प्रबोधिनीच्या राष्ट्रीय खेळाडूंनी क्रीडामंत्र्यांना दिला. यावेळी क्रीडामंत्री कोकाटे यांनी खेळाडूंशी चर्चा करतांना त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्यासाठी दरवर्षी कमीत कमी एक तरी स्पर्धा आपण नाशिकला आयोजित करण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन त्यांनी दिले. स्थानिक खेळाडूंना स्पर्धात्मक अनुभवाची गरज अधोरेखित करताना राज्याच्या नकाशावर नाशिक जिल्ह्याचे नाव अग्रस्थानी राहण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, याची ग्वाही त्यांनी खेळाडूंना दिली.
विविध आस्थापनांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) क्रीडा क्षेत्रासाठी कशी मदत मिळेल, यासाठी आणि त्या माध्यमातून खो-खोसारख्या प्रबोधिनींना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे कोकाटे यांनी नमूद केले. खो-खो खेळाडूंच्या भविष्याबद्दल त्यांनी आस्थेने विचारपूस केली. खो-खो प्रबोधिनी आणि सरावाच्या ठिकाणी भेट देऊन तिथे जास्तीतजास्त सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक काळजी घेण्यात येईल.
येणाऱ्या दशकात नाशिकचे क्रीडा क्षेत्र विकसित होण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांची लवकरच एक सभा आयोजित करण्यात येणार असल्याचे कोकाटे यांनी नमूद केले. शासकीय मदतीशिवाय खो-खो प्रबोधिनीने ग्रामीण भागातील खेळाडूंना जे मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले, त्याबद्दल खो-खो प्रबोधिनीचे कौतुक करून तुमच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, असे सांगून खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
प्रबोधिनीचा वार्षिक अहवाल राष्ट्रीय खेळाडू कौसल्या पवार, पुस्तक भेट वृषाली भोये हिने तर शुभेच्छापत्र निशा वैजल या खेळाडूंनी दिले. याप्रसंगी नाशिक जिल्हा खो- खो संघटनेचे सचिव आणि मार्गदर्शक उमेश आटवणे, शानुल देशमुख , उपाध्यक्ष सचिन निरंतर आणि राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते.