जळगाव – शहरातील जुन्या महामार्गावर पथदिव्यांच्या देखभालीवर दरवर्षी लाखो रूपयांचा खर्च होत असला, तरी अंधाराचे साम्राज्य कायम असते. त्यामुळे पाळधी ते तरसोद दरम्यानच्या नवीन बाह्यवळण महामार्गावरील पथदिव्यांचा झगमगाट वाहनधारकांसाठी दिलासादायक ठरला आहे.

शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावरील अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन पाळधी ते तरसोद या बाह्यवळण मार्गाचे काम काही वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर हा रस्ता वाहतुकीसाठी एकदाचा खुला झाल्याने जळगाव शहराच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. विशेषतः शहराचा विस्तार आता उत्तरेकडे होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

नवी मुंबईच्या धर्तीवर नवे जळगाव त्या दिशेला उभे राहण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. शहरालगतची गावे या विकास प्रक्रियेत सामील होत असल्याने त्यांची सुद्धा किंमत वाढली आहे. रिअल इस्टेट क्षेत्राचेही या भागाकडे लक्ष वेधले गेले आहे. याचबरोबर बाह्यवळण महामार्ग जळगाव विमानतळाच्या शेजारून थेट समृद्धी महामार्गाशी जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्याने भविष्यातील प्रगतीला आणखी गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, जळगावला विकासाचे नवे स्वप्न दाखवणार्‍या पाळधी ते तरसोद दरम्यानच्या बाह्यवळण महामार्गावर पथदिवे बसविण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू आहे. त्यापैकी काही पथदिवे पाळधीकडून पहिल्या टप्प्यात सुरू देखील झाले आहेत. परिणामी, बाह्यवळण महामार्ग रात्रीच्या वेळी उजळून निघत आहे.

नवीन प्रकाश योजनेमुळे बाह्यवळण महामार्गालगतचा परिसर अधिक आकर्षक भासत आहे. याशिवाय वाहनधारकांना अधिक सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळत आहे. आव्हाणे, ममुराबाद, आसोदा आणि तरसोद या भागातही पथदिवे बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. केवळ विद्युतीकरणाची प्रक्रिया बाकी आहे. तीही लवकरच पूर्ण होऊन संपूर्ण महामार्ग आधुनिक प्रकाश योजनेने उजळणार आहे.

औद्योगिकरणाला गती

बाह्यवळण महामार्गालगतच्या पाळधी, बांभोरी, भोकणी, आव्हानी, आव्हाणे, ममुराबाद, आसोदा आणि तरसोद या काही गावांमधील अनेक सुशिक्षित बेरोजगार तरूण आणि शेतकऱ्यांचा कृषी आधारीत प्रक्रिया तसेच इतर काही उद्योग सुरू करण्याकडे कल आहे. त्यामुळे बाह्यवळण महामार्गालगतच्या शेती शिवाराला बिनशेतीकरणासह शासनाच्या २०२३ च्या औद्योगिक धोरणानुसार डी प्लस दर्जा दिल्या दिल्यास अनेक उद्योग सुरू होऊ शकतील. ज्यामध्ये सोलर, आयटी पार्क आणि अन्न प्रक्रिया उद्योगांचा समावेश असेल.

बाह्यवळण महामार्गालगतच्या गावांमध्ये औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी भाजपचे जळगाव शहरातील आमदार सुरेश भोळे यांनी यापूर्वीच शासनाकडे केली आहे. त्याची अमलबजावणी झाल्यास बाह्यवळण महामार्गालगत औद्योगिकरणाला चांगली गती मिळू शकेल. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढल्याने बेरोजगारांचे स्थलांतर थांबेल, अशी आशा व्यक्त होत आहे.