धुळे : लोकसहभागातून उत्तर महाराष्ट्रात नैसर्गिक संपन्न झालेले आदर्श गाव बारिपाडा आणि परिसरातल्या मोहगाव, चावडीपाडा, पिंपळगाव खुर्द व विजयपूर या गावांमध्ये ’तीन दिवस राष्ट्रासाठी बारीपाडा – २०२५’ हा उपक्रम राबविण्यात आला. पहिल्या टप्यात १८० आणि दुसऱ्या टप्यात १०० विद्यार्थी व डॉक्टरांनी या उपक्रमात सहभाग घेऊन निसर्गसंपन्न बारीपाड्याची सहल झालीच, पण पहाडपट्ट्यात जीवन जगणाऱ्या शेकडो कुटुंबाकडून त्यांना ’नैसर्गिक जीवन जगण्याचा नवा धडा’ही मिळाला.

छत्रपती संभाजीनगर येथील सेवांकुर नर्सिंग संघटनेच्या माध्यमातून ७ ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान साक्री तालुक्यात ’तीन दिवस राष्ट्रासाठी बारीपाडा – २०२५’ हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमाच्या प्रारंभी पद्मश्री चैत्राम पवार व डॉ. आनंद पाठक यांनी उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या चार परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयांतून निवड झालेले एकूण १०० विद्यार्थी आणि डॉक्टर या उपक्रमात सहभागी झाले होते. ज्यांनी वयाच्या १८ व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर केला त्या मोहगाव येथील चंद्रकलाताई गावित यांची या उपक्रमादरम्यान मुलाखत झाली.

विद्यार्थ्यांनी वयोवृद्ध समाजगटाचे सर्वेक्षण करून आरोग्य जनजागृती केली. यावेळी सर्वेक्षणात आढळलेल्या उच्च रक्तदाब व मधुमेहाच्या रुग्णांना पुढील उपचारासाठी वैद्यकीय सल्ला देण्यात आला.जवळपास ३०१ वृद्ध व्यक्तींची या उपक्रमात तपासणी करण्यात आली. सभोवतालच्या चारही गावांमध्ये विद्यार्थ्यांनी उच्च रक्तदाब व मधुमेह या विषयांवर प्रदर्शनाद्वारे जागृती करण्यात आली.

भारतीय संस्कृती व जनजातींच्या चालीरीतींची ओळख व्हावी म्हणून पोस्टर स्पर्धा आणि भजन संध्या यांसारखे सांस्कृतिक उपक्रमही यावेळी राबवण्यात आले. तीन दिवस रोज सकाळी विद्यार्थ्यांसाठी योग सत्राचे आयोजन करण्यात आले आणि शारीरिक स्वास्थ्याचे महत्त्व सांगण्यात आले. बारिपाडा ग्रामस्थांनी तीस वर्ष श्रमदान करून उभारलेल्या एक हजार १०० एकरवर विस्तारलेल्या घनदाट जंगलातून फेरफटका मारल्यावर विद्यार्थ्यांचे शबरीधामकडे प्रस्थान झाले.

पद्मश्री चैत्राम पवार म्हणाले, ’तीन दिवस किंवा सात दिवस राष्ट्रासाठी’ हा उपक्रम सुरू झाला आहे. या उपक्रमांतर्गत संभाजीनगर येथील डॉ. तुपकर यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. देशभरातील आणि महाराष्ट्र राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयात किंवा वैद्यकीय संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आणि उदयन्मुख डॉक्टरांसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरू लागला आहे. वैद्यकीय शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर प्रामुख्याने दुर्गम भागातील रहिवाशांच्या आरोग्य विषयक समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यावरील उपाय,पर्याय शोधणे हा या महत्वाकांक्षी उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे.