नाशिक – शासकीय आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहात रिक्त असलेल्या जागी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची त्वरीत नेमणूक करावी, या मागणीसाठी आमदार नितीन पवार यांच्यासह शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, पालक तसेच ग्रामस्थांनी कळवण प्रकल्प कार्यालयासह काही शाळांना कुलूप लावले. शाळा बंद असल्याने मुलांनी पालकांकडे घरी घेऊन चला, असा हट्ट धरला आहे. मुलांची होणारी गैरसोय पाहून पालकांनी मुलांचे सामान आवरत घरी नेण्यास सुरूवात केली आहे.
आदिवासी आश्रमशाळा कंत्राटी कर्मचारी वर्ग तीन व चार यांचे २१ दिवसांपासून नाशिक येथील आदिवासी विकास भवन परिसरात बिऱ्हाड ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे पडसाद आता जिल्ह्यात उमटण्यास सुरूवात झाली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप आदिवासी आश्रमशाळांमध्ये अध्यापन बंद आहे. काही ठिकाणी शिक्षक असले तरी त्यांच्यावर अतिरिक्त भार आहे. काही जण आंदोलनात तर, काही ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वानवा आहे.
अध्यापन होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला गळती लागली आहे. विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना जाब विचारावा तरी कोणाला, या संभ्रमात असलेल्या पालकांनी , ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावण्यात सुरूवात केली आहे. सोमवारी सुरगाणा, कळवण तालुक्यातील काही आश्रमशाळांना कुलूप लावल्यानंतर विद्यार्थीही पालकांशी संपर्क करत घरी घेऊन चला असा हट्ट करु लागले आहेत. शाळा सुरू झाल्यापासून जेवणात केवळ भात आणि खिचडी खावी लागत आहे.
दीड महिना होऊन गेला तरी अजून एकही विषय शिकवलेला नाही. स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छता असल्याने ते स्वच्छ करण्याची वेळ आमच्यावर आली असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या. नागपंचमीनिमित्त परंपरेनुसार पालकांनी मुलांसाठी गोड रोटी आणली. परंतु, मुलांचे होत असलेले हाल पाहता मुलांना घरी नेण्यास सुरूवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी सामाजिक संघटना शाळांचे सर्व्हेक्षण करत पटसंख्या किती, उपस्थिती किती, याची माहिती संकलित करत पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत.