|| चारूशीला कुलकर्णी

 बाळांमधील व्यंगत्वाचे प्रमाण कमी करण्यात यश ;  पेठ तालुक्यातील पथदर्शी प्रयोगाचे फलित

माता-बालमृत्यूच्या आकडेवारीत आदिवासी भागातील चित्र चिंताजनक आहे. ही स्थिती बदलण्यासाठी पुणे येथील भारती विद्यापीठ आणि आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. ‘मातृत्व आणि नवजात बालकाची गर्भधारणेपूर्वी घ्यावयाची काळजी’ या पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून सध्या पेठ तालुक्यात काम सुरू आहे.

या प्रकल्पामुळे महिलांचे ‘बीएमआय’ वाढले असून ९८३ महिलांचे हिमोग्लोबीन वाढले. महत्वाचे म्हणजे जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये व्यंगत्व प्रमाण कमी झाले आहे.

पेठ तालुक्यात मातृत्व आणि नवजात बालकाची गर्भधारणेपूर्वी घ्यावयाची काळजी या प्रकल्पांतर्गत माता-बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न होत आहे. या मृत्यूची कारणे, कुपोषण, बालकांमध्ये जन्मत येणारे व्यंग यासह अन्य काही प्रमुख प्रश्नांचा प्रामुख्याने विचार करण्यासाठी लक्ष्यगट निश्चित करण्यात आला. आशा, स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, आशा गटप्रवर्तक, तालुका समुह संघटक यांच्या माध्यमातून पेठ तालुक्यातील एक हजार ९०१ महिलांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये ज्यांना मूल हवे आहे किंवा ज्या गरोदर आहेत, याचा समावेश करण्यात आला. या महिलांच्या तपासणीसाठी शिबिराचे नियोजन करत त्यांना असलेल्या आजारपणाची माहिती घेण्यात आली. यामध्ये महिलांना हृदयरोग, क्षयरोग, मिर्गी, उच्चरक्तदाब, मधुमेह, गलगंड, लैंगिक आणि प्रजननजन्य आजार, सिकलसेल, व्हिडीआरएल, थायरॉईड या सर्व आजारांची आणि रक्ताची तपासणी करण्यात आली. . एक हजार ११८ महिलांनी तंबाखू खाणे, मिश्री लावणे बंद  केले आहे.

बीएमआयचे महत्व

बीएमआय म्हणजे ‘बॉडी इन्डेक्स मार्क ’ गरोदरपणात गरोदर मातेचे वजन आणि उंची नुसार गर्भातील बाळाची वाढ होते का, याचा निर्देशक बीएमआय असतो. हा निर्देशांक १८.५ च्या पुढे आणि २५ पर्यंत हवा. १८.५च्या आत किंवा २५च्या बाहेर असेल तर ते गरोदरमातेसाठी धोकादायक ठरते.

आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकेच्या माध्यमातून पेठ तालुक्यात ‘मातृत्व आणि नवजात बालकाची गर्भधारणापूर्वी घ्यावयाची काळजी’ उपक्रम राज्यात १४ जिल्ह्य़ांमध्ये राबविण्यात येणार आहे. आदिवासीबहुल पेठ तालुक्यात महिलांचे प्रश्न गुंतागुंतीचे आहेत. कुपोषण, कमी वयातील लग्न, रक्ताची कमतरता या कारणांस्तव विविध आजार महिलांना आहेत. याशिवाय काही व्यसनेही त्यांना आहेत. याचा परिणाम प्रजनन प्रक्रियेवर होत असून त्याची परिणती कधीकधी माता-बालमृत्यूत होते. मात्र या प्रकल्पामुळे वेळेत गरोदरपणातील धोके ओळखता येत असल्याने ही आकडेवारी कमी होण्यास मदत होत आहे. – डॉ. मोतीलाल पाटील (तालुका वैद्यकीय अधिकारी, पेठ)