अंगणवाडीतील पोषण आहाराचे प्रलंबित देयक मंजूर करण्यासाठी १४०० रुपयांची लाच स्वीकारताना सोमवारी चांदवड येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील पर्यवेक्षिका भारती गणपत गवळी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.
या प्रकरणी चांदवडच्या वडनेर भैरव येथील जय अंबिका बचत गटातील सदस्यांनी तक्रार दिली होती. हा बचत गट अंगणवाडीला पोषण आहार पुरवितो. बचत गटाचे मागील सात महिन्यांपासून देयक मिळालेले नव्हते. देयकाची ही रक्कम ३१ हजार ५०० रुपये आहे. बचत गटाने प्रलंबित देयक मंजूर करण्यासाठी चांदवडच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात सादर केले होते. ही रक्कम मंजूर करण्यासाठी पर्यवेक्षिका भारती गवळी यांनी १४०० रुपयांची मागणी केली. तक्रारदाराच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी चांदवडच्या बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात सापळा रचला. दुपारी पावणे दोनच्या सुमारास कार्यालयात ही रक्कम स्वीकारत असताना पर्यवेक्षिका गवळी यांना रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, शासकीय कार्यालयात कोणीही कर्मचारी वा अधिकारी पैशांची मागणी करत असेल तर नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.