जळगाव – अमळनेर येथील दंगल प्रकरणातील संशयिताच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यूला दहा-पंधरा दिवसही उलटत नाही, तोच तळवेल (ता. भुसावळ) येथील न्यायालयीन कोठडीतील संशयिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करीत कुटुंबियांसह विविध सामाजिक संघटनांकडून त्याबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी पोलीस अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तळवेल (ता. भुसावळ) येथील रहिवासी शरीफ आलम पिंजारी (३०) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला असल्याने त्याबाबतची सखोल चौकशी करून संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, जिल्हा पिंजारी समाजाचे अध्यक्ष अख्तर पिंजारी, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अहमद शेख, मलिक फाउंडेशनचे नदिम मलिक, ईदगाह ट्रस्ट व शाह बिरादरीचे अनिस शाह, रोशन पिंजारी, हारुन, रशीद, शरीफ, इब्राहिम, रफिक, निसार व अफजल पिंजारी, भुसावळचे रशीद पिंजारी आदींनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे केली आहे. सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळातर्फे निवेदनाची प्रत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गणेश देशमुख यांना देण्यात आली.

हेही वाचा – नाशिकऐवजी गुलशनाबाद कोणाला प्रिय? शुभेच्छा फलकामुळे चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत शरीफ आलमवर तळवेल येथील नेहरू विद्यामंदिरातील पाण्याची वीजमोटार लांबविल्याचा आरोप आहे. त्याला त्या ठिकाणी लोकांनी मारहाण केली होती. संबंधित वीजमोटार दुसर्‍या दोन व्यक्तींनी मुलींच्या शाळेतून काढून आणून पोलिसांना त्याच वेळी दिली होती. तरीही त्याच्याविरुद्ध वरणगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर भुसावळ येथील कारागृहात असताना २४ जूनला शरीफ आलमची प्रकृती बिघडल्याने कारागृहाच्या अधीक्षकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याबाबत २५ जूनला शरीफ याच्या चुलतभावाला पोलिसांनी दूरध्वनीवरून संपर्क करीत, तुमच्या भावाला प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल केले आहे. आपण जाऊन बघा, असे पोलीस शिपाई देविदास कमलाकर यांनी कळविले होते. त्याप्रमाणे मृताचे काका व वडिलांनी रुग्णालयातील कैदी वॉर्डात भेट घेतली. त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने २६ जूनला अतिदक्षता कक्षात दाखल केले. २७ व २८ जूनला तो बेशुद्ध होता आणि त्याचा गुरुवारी मृत्यू झाला. दरम्यान, शवविच्छेदन तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत करण्यात येत असल्याची माहिती डॉ. परेश जैन यांनी शिष्टमंडळाला दिली.