दुधाच्या योग्य दरासाठी सोमवारपासून आंदोलन;  मुंबईचा पुरवठा रोखणार; दररोजच्या विक्री व्यवस्थेची शेतकऱ्यांना चिंता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : दुधाला प्रति लिटर पाच रुपये दराने अनुदान मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेने सोमवारपासून मुंबईला करण्यात येणारा दूधपुरवठा रोखणारे आंदोलन पुकारले आहे. परंतु आंदोलनादरम्यान दररोजची उत्पादित होणाऱ्या दूध विक्रीची व्यवस्था कशी करावी याबाबत नियोजन नसल्याने या आंदोलनात होणाऱ्या नुकसानीने शेतकरी धास्तावलेले आहे.  दरम्यान, हे आंदोलन मोडीत  काढण्यासाठी प्रशासकीय पातळीवर दूध वितरण प्रक्रिया सुलभ ठेवण्याची तयारी सुरू झाली आहे.

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातून दररोज मुंबईला एक लाखहून अधिक लिटर दुधाचा पुरवठा होतो. सिन्नर तालुक्यातून मुंबईला मोठय़ा प्रमाणात दूध पाठविले जाते. मात्र, सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी दरात दुधाची विक्री करावी लागत असल्याने शेतकऱ्यांचा महत्त्वाचा पूरक उद्योग अडचणीत आला आहे. दुधाचा उत्पादन खर्च ३६ रुपये लिटर आहे. सध्या त्याची खरेदी १६ ते १७ रुपयांनी होत आहे. दुधाची भुकटी बनविणारे तसेच निर्यात करणाऱ्यांसह दूध संघांना शासन अनुदान देऊन शेतकऱ्यांऐवजी धनदांडग्यांचे हित जोपासत आहे, असा  आरोप संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी केला आहे.

अन्य घटकांना अनुदान देण्याऐवजी पाच रुपये प्रति लिटर शेतकऱ्याच्या बँक खात्यात ते जमा करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.  या मागणीसाठी मुंबईचा दूधपुरवठा बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. परंतु शासन पोलिसी बळावर हे आंदोलन चिरडण्याची भाषा करीत आहे.  आमचे आंदोलन कोणी दडपू शकणार नाही, असे पदाधिकाऱ्यांनी सूचित केले आहे.

आंदोलन काळात दूध संघ, संकलन केंद्रांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली. नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समिती, किसान सभा यांच्यासह विविध संघटनांनी आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

आंदोलनात नुकसानीची झळ पोहोचू नये यासाठी आंदोलन काळात शेतकऱ्यांनी संघाला दूध न देता ते स्थानिक पातळीवर शाळा-महाविद्यालयात, आषाढी यात्रेतील वारकरी आदींना विक्री करावे, दुधावर प्रक्रिया करून  खवा निर्मिती करावी, असे आवाहन स्वाभिमानीने केले आहे. प्रति लिटरला पाच रुपये अनुदान मिळावे यासाठी शेतकरी काही नुकसान सहन करतील, असा विश्वास वडघुले यांनी व्यक्त केला आहे.

अतिरिक्त दुधाचा प्रश्न

दुग्ध विकास अधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार नाशिक, जळगाव, धुळे या जिल्ह्य़ासह आसपासच्या भागातून नाशिकमार्गे मुंबईला दररोज ५० हजार ते एक लाख लिटरच्या आसपास दूधपुरवठा होत असल्याचे सांगण्यात आले. हा पुरवठा बंद झाल्यास शेतकरी वर्गासमोर अतिरिक्त दुधाचे काय करायचे, हा प्रश्न निर्माण होणार आहे. दुधाला आधीच कमी भाव मिळतो. आंदोलन लांबल्यास भाव आणखी गडगडतील, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. प्रशासनाने नाशिकमार्गे किती दूध मुंबईला जाते, याची माहिती संकलीत केली असून आंदोलन काळात दूध वितरण प्रक्रिया सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swabhiman sanghatana movement to stop milk supply to mumbai
First published on: 14-07-2018 at 02:36 IST