लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यत पोहचावेत, यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने जिल्ह्यात १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रेच्या पहिल्या टप्प्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी ही यात्रा यशस्वी करण्यासाठी सूत्रबद्ध नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बैठकीत दिल्या.
विकसित भारत संकल्प यात्रा निमित्ताने शनिवारी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपजिल्हाधिकारी (प्रशासन) भिमराज दराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) वर्षा फडोळ, लीड बँकेचे व्यवस्थापक पाटील, जिल्हा सूचना केंद्राचे संजय गंजेवार आदी उपस्थित होते.
आणखी वाचा-मध्य रेल्वेत तिकिटांचा काळाबाजार; सहा महिन्यात २६९ गुन्हे, ३१७ जणांना अटक
यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी, जनजाती गौरव दिनाच्या दिवशी १५ नोव्हेंबर रोजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते या विकसित भारत संकल्प यात्रेचा प्रारंभ होणार असल्याचे सांगितले. पहिल्या टप्प्यात १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील १४ ग्रामपंचायतींमध्ये या यात्रेचे आयोजन केले जाणार आहे. या यात्रेमार्फत ग्रामस्वराज्य अभियान राबविले जाणार असून अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून राबविण्यात येणार आहे. या यात्रेसाठी शासनाकडून सुसज्ज अशा व्हॅन जिल्ह्यात येणार असून त्यांच्यामार्फत सहा तालुक्यात तसेच नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी केली जाणार आहे.
ही यात्रा पुढील टप्प्यात गावपातळी, सर्व ग्रामपंचायत क्षेत्र, नगरपालिका, महानगरपालिकेच्या क्षेत्रात जाणार असल्याने या यात्रेचे दरदिवसाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या यात्रेत भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यापर्यंत पोहचविणे आणि विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य ती कार्यवाही यंत्रणेने करावी, या यात्रेसाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार मनुष्यबळ, वाहनव्यवस्था, यात्रेच्या जाण्या-येण्याची व्यवस्था, स्थळ इत्यादींची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करावी. यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर समन्वय समिती गठीत करण्याच्या व प्रत्येक कामासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी शर्मा यांनी बैठकीत दिल्या.