‘डिफेन्स इनोव्हेशन हब’ म्हणून जाहीर झालेल्या नाशिकमध्ये संरक्षण-अंतराळशास्त्रासह विजेवर आधारित इलेक्ट्रिक मोटारींच्या प्रकल्पासाठी प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांनी स्वारस्य दाखविले आहे. भाजप उद्योग आघाडीच्या पुढाकारातून बडय़ा उद्योगपतींची भेट घेऊन त्यांना नाशिकमधील पायाभूत सुविधा, गुंतवणुकीच्या संधींविषयी माहिती देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शिष्टमंडळाने रतन टाटा यांची भेट घेतली. औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांची व्याप्ती, संरक्षण, उत्पादन क्षेत्रातील उद्योगांसाठी उपलब्ध संधी जाणून घेतल्यानंतर टाटा यांनी महिनाभरात टाटा समूहाचे पथक सर्वेक्षणासाठी नाशिकला पाठविणार असल्याचे सांगितले.
भाजप उद्योग आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मुंबई येथे ही भेट घेण्यात आली.
आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार, आनंद सूर्यवंशी, किरण चव्हाण, युवराज वडजे यांनी नाशिकच्या औद्योगिक आणि पायाभूत सुविधांची माहिती दिली. ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पांतर्गत सरकार देशातील उद्योगांना संरक्षण साहित्य क्षेत्रात उतरविण्यासाठी प्रयत्नशील आहे. स्थानिक पातळीवरील उद्योगाला पोषक वातावरण, आवश्यक त्या सोयी- सुविधांची माहिती चर्चेत मांडली गेली. टाटा समूहास संरक्षणसामग्री उत्पादन, अन्न प्रक्रिया, इलेक्ट्रिक वाहन आणि त्यासाठीच्या पायाभूत सुविधा, माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील कोणत्याही प्रकल्पासाठी नाशिकमध्ये गुंतवणूक करावी, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. त्याकरिता राज्य शासन सर्व मदत करेल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. पुढील दिशा ठरविण्यासाठी टाटा समूहाचे खास पथक सर्वेक्षणासाठी महिनाभरात नाशिकला पाठविले जाईल, असेही टाटा यांच्याकडून सांगण्यात आले.
स्थानिक पातळीवरील लघू-मध्यम उद्योग महिंद्रा, बॉश यासारख्या वाहन क्षेत्रातील बडय़ा उद्योगांवर अवलंबून आहेत. भविष्यात डिझेल किंवा पेट्रोलऐवजी इलेक्ट्रिक अर्थात विजेवर चालणाऱ्या वाहनांचे युग राहील. सध्या स्थानिक पातळीवरील लघू-मध्यम उद्योग डिझेल, पेट्रोल वाहनांवरील आधारित सुटे भाग बनवितात. बदलाच्या प्रक्रियेमुळे स्थानिक उद्योगांवर संकट निर्माण होणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पात गुंतवणूक झाल्यास स्थानिक उद्योग अपेक्षित बदल साधतील, याकडे पेशकार यांनी लक्ष वेधले.