मालेगाव : तालुक्यातील टेहरे येथील समता विद्यालयातील वादग्रस्त शिक्षक भरतीला अखेर स्थगिती देण्यात आली आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली तेव्हा या संस्थेशी संबंधित तक्रारींकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दोन महिन्यांनी जाग आल्याचे दिसत आहे. उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्यावर आता शिक्षक भरती करू नये, असे बजावणाऱ्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांची कृती वराती मागून घोडे या थाटातील असल्याचे अधोरेखित होत आहे.
१९८२ मध्ये स्थापन झालेल्या सर्वांगीण विकास मंडळ संस्थेतर्फे टेहरे येथे समता विद्यालय ही माध्यमिक शाळा चालविली जाते. संस्थेच्या १३ विश्वस्तांपैकी एकूण नऊ जणांचे निधन झाले आहे. आजच्या घडीला केवळ चारच विश्वस्त अस्तित्वात असल्याने सभेसाठी गणपूर्ती होत नाही. तसेच सन २००२ पासून संस्थेत नियमानुसार विश्वस्त मंडळ अस्तित्वात येऊ शकले नाही आणि नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याचे अर्ज धर्मदाय उपायुक्तांकडे प्रलंबित आहेत, अशी सारी वस्तूस्थिती आहे.
या पार्श्वभूमीवर, दोन महिन्यांपूर्वी राज्य शासनाकडून पवित्र पोर्टलद्वारे (टप्पा दोन) शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. या अनुषंगाने समता विद्यालयातील शिक्षकांची सहा रिक्त पदे भरण्यासाठी शिक्षण विभागाकडे मागणी नोंदविण्यात आली. त्यानुसार संस्थेकडे मुलाखतींसाठी ५१ उमेदवारांची नावे पाठवण्यात आली. संस्थेचे विश्वस्त मंडळ हे नियमानुसार नियुक्ती प्राधिकरण असते. परंतु या संस्थेत नियुक्ती प्राधिकरण नसल्याने भरती प्रक्रिया राबविणे बेकायदेशीर ठरेल, अशी पत्रे देऊनही माध्यमिक शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक कार्यालयाने त्याकडे दुर्लक्ष करत ही भरती प्रक्रिया रेटून नेण्यासाठी संबंधितांना मदत केल्याची तक्रार जिभाऊ शेवाळे व दयाराम शेवाळे या दोघा संस्थापक विश्वस्तांनी केली होती. माजी मुख्याध्यापक असलेल्या विश्वस्ताने संबंधित उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, यालाही उभयतांनी हरकत घेतली. त्यामुळे ही भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरली होती.
दरम्यानच्या काळात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी धर्मदाय उपायुक्त कार्यालयाकडे या संस्थेत विश्वस्त मंडळ अस्तित्वात आहे का, अशी लेखी विचारणा केली. त्यानुसार या कार्यालयाने वस्तूस्थिती कळविल्यानंतर शिक्षक भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. विश्वस्त मंडळ अस्तित्वात नाही, या कारणावरून पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्प्यातील भरतीच्या वेळी समता विद्यालयातील शिक्षक भरतीची जाहिरात नामंजूर करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यातील भरतीच्या प्रसंगी टेहरे येथील शिक्षण संस्थेत विश्वस्त मंडळ अस्तित्वात नसल्यासंबंधी पूर्वीची स्थिती कायम असताना भरतीला मान्यता दिली गेली होती. त्यामुळे माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या भरती प्रक्रियेशी माझा संबंध नाही. शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या स्तरावर नियमानुसार मुलाखत प्रक्रिया पार पाडली आहे. पवित्र पोर्टलद्वारे सुरु झालेली ही भरती प्रक्रिया बेकायदेशीर असती तर शिक्षण विभागाने त्यास परवानगीच दिली नसती. – डी. डी. पाटील (सचिव, सर्वांगीण विकास मंडळ)