scorecardresearch

कोटमगावसह जिल्ह्यातील सहा देवस्थानांना ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त; गावांच्या विकासालाही मदत होणार

येवला तालुक्यातील कोटमगाव येथील श्री जगदंबा देवस्थान मंदिर परिसरात भक्त निवास, सभामंडप, स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा, परिसर सुशोभीकरण यासह विविध विकासाची कामे करण्यात आली आहेत.

नाशिक: ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत येवला तालुक्यातील कोटमगावचे श्री जगदंबा देवस्थान, सिन्नर तालुक्यातील नांदूरिशगोटे येथील श्री रेणुका माता मंदिर, देवळा तालुक्यातील उमराणे येथील श्री रामेश्वर मंदिर, निफाड तालुक्यातील साकोरे मिग येथील श्री खंडेराव महाराज मंदिर, सुकेणे येथील श्री क्षेत्र दत्त मंदिर देवस्थान तसेच पिंपळगाव बसवंत येथील श्री क्षेत्र श्रीराम मंदिर या तीर्थक्षेत्रांना ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे या तीर्थक्षेत्राच्या विविध विकासकामांसाठी शासनाकडून लवकरच अधिक निधी प्राप्त होऊन या देवस्थानच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी चांगल्या मूलभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत

 येवला तालुक्यातील कोटमगाव येथील श्री जगदंबा देवस्थान मंदिर परिसरात भक्त निवास, सभामंडप, स्वच्छतागृह, पाण्याची सुविधा, परिसर सुशोभीकरण यासह विविध विकासाची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे राज्यभरातील भाविक या ठिकाणी मोठय़ा संख्येने येत असतात. या भाविकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी या देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त व्हावा याकरिता पालकमंत्री भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू होता. येवला तालुक्यातील या प्रसिद्ध देवस्थानाला ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्याने पर्यटन तसेच यात्रास्थळ विकास योजनेअंतर्गत याठिकाणी अधिक सुविधा प्राप्त करण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या भाविकांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. परिणामी, याठिकाणी भाविक अधिक मोठय़ा संख्येने येऊन पर्यटनातदेखील वाढ होणार आहे. त्यामुळे परिसरातील अर्थकारणालादेखील अधिक गती प्राप्त होणार आहे. 

जिल्ह्यातील इतर तीर्थक्षेत्रांच्या दर्जातदेखील वाढ झाली आहे. त्यात नांदूरिशगोटे, उमराणे, साकोरे मिग, सुकेणे तसेच पिंपळगाव बसवंत या गावांचा समावेश आहे. तीर्थस्थळ हे गावांच्या विकासासाठी कारणीभूत होऊ लागले आहेत. तीर्थस्थळांमुळे त्या त्या गावाची प्रसिध्दी होत असते. त्या गावात येणाऱ्या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असते. त्यामुळे गावाच्या अर्थकारणासही गती मिळते. गावापर्यंतच्या रस्त्यांची दुरुस्ती केली जाते. दळणवळणात वाढ होते. रोजगारवाढीस मदत होते.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Temples including accorded b class status development villages ysh

ताज्या बातम्या