जळगाव – भुसावळ येथील माजी नगराध्यक्षांसह दहा नगरसेवकांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांना मोठा धक्का मानला जात आहे. ते सर्व खडसे यांचे समर्थक होते. माजी नगराध्यक्षांसह दहा नगरसेवकांना सहा वर्षे निवडणूकबंदी राहील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>तुम्ही राजकारणात येणार का? निवडणूक लढणार का? संभाजीराजे छत्रपतींचं सूचक विधान, म्हणाले…

तत्कालीन भाजपच्या नगराध्यक्षांनी सतरा डिसेंबर २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला होता. याबाबत भाजपच्या नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी २८ डिसेंबर २०२१ रोजी संबंधित माजी नगराध्यक्ष व नगरसेविकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी याप्रकरणी अंतिम सुनावणी करीत माजी नगराध्यक्षांसह दहा नगरसेवकांना सहा वर्षांपासून निलंबित केल्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा >>>..त्यामुळेच शेतकऱ्यांसाठी बाजारपेठांचे विकेंद्रीकरण गरजेचे – छगन भुजबळ यांची अपेक्षा

भुसावळ येथे २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या कमळ या चिन्हावर रमण भोळे हे लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले होते. त्यांच्यासोबत भाजपचे पंचवीस नगरसेवक निवडून आले होते. मात्र, त्यांची मुदत पूर्ण होण्यापूर्वीच सतरा डिसेंबर २०२१ रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यामुळे त्यांना अपात्र करावे यासाठी भाजपच्या नगरसेविका पुष्पा बत्रा यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन जिल्हाधिकार्‍यांनी १८ जुलै २०२२ रोजी निर्णय दिला होता. या निकालात तत्कालीन नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह नगरसेवक बोधराजू चौधरी, अमोल इंगळे, प्रमोद नेमाडे, लक्ष्मी मकासरे, शोभा नेमाडे, मेघा् वाणी, किरण कोलते, शैलजा नारखेडे, सविता मकासरे यांना अपात्र करण्यात आले होते.जिल्हाधिकार्‍यांच्या या निर्णयाला या दहाही जणांनी नगरविकास विभागाकडे दाद मागितली होती. यावर दोन्ही बाजूंची सुनावणी झाल्यानंतर नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी यांनी या सर्वांचे अपील फेटाळत जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय कायम ठेवला आहे. परिणामी रमण भोळे यांच्यासह दहा नगरसेवकांना आता सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढविता येणार नाही. या निर्णयाचा आगामी निवडणुकांवर परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ten corporators including former mayor of bhusawal are ineligible for election amy
First published on: 19-10-2022 at 12:08 IST