जळगाव – राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अधिवेशनादरम्यान सभागृहात भ्रमणध्वनीवर ऑनलाईन पत्ते खेळत असल्याची एक कथित चित्रफीत समाज माध्यमावर व्हायरल झाली आहे. त्यावरून मंत्री कोकाटे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असताना, जळगावमध्येही शिवसेनेने (उद्धव ठाकरे) सोमवारी त्यांच्या प्रतिमेला चुना फासला. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाकरे गटाचे जळगाव ग्रामीण उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली. महायुतीमधील अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, शिंदे गटाचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि हनी ट्रॅप प्रकरणी गुन्हा दाखल झालेले भाजपचे प्रफुल्ल लोढा यांच्या प्रतिमेला चुना फासून तीव्र निषेध करण्यात आला. राज्यात दररोज आठ शेतकरी शासनाच्या धोरणामुळे आत्महत्या करत आहेत. आणि तिकडे कृषीमंत्री सभागृहात ऑनलाईन पत्ते खेळण्यात व्यस्त आहेत. मंत्र्यांना पत्ते खेळण्याच्या नादात शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतीमालाचा हमीभाव, भाव फरक या सर्व गोष्टीचा विसर पडला आहे, अशी टीका ठाकरे गटाचे उप जिल्हाप्रमुख प्रा. सोनवणे यांनी केली. आईच्या नावाने डान्सबार चालविणारे गृहराज्यमंत्री कदम यांच्यासह हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित लोढा यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. आंदोलनात ठाकरे गटाचे जळगाव तालुका कार्याध्यक्ष प्रमोद घुगे, अशोक सोनवणे, किरण ठाकूर, लोटन सोनावणे, प्रभाकर कोळी, धनराज वारडे, रघुनाथ सोनवणे, स्वप्नील पाटील, खुशाल पाटील, राजू पाटील, अनिल बोरसे, नितीन चौधरी आदी सहभागी झाले होते.
छावा संघटनेकडूनही राजीनाम्याची मागणी
अखिल भारतीय छावा संघटनेकडुनही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना सोमवारी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी कोकाटे यांना मंत्रीपदावरून तातडीने पायउतार करून घरी पत्ते खेळण्यास पाठवावे. त्यांना शेतकऱ्यांचे काही एक पडलेले नाही, असे छावा संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले. लातुरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या अजित पवार गटाच्या युवक प्रदेशाध्यक्षांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर देखील गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी छावा संघटनेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली. संबंधितांवर तातडीने गुन्हे दाखल न झाल्यास छावा संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा ज्येष्ठ नेते भीमराव मराठे यांच्यासह संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष राजू कुमावत, पारोळा तालुकाध्यक्ष विजय पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, एरंडोल तालुकाध्यक्ष उमेश पाटील, आयटी आघाडी प्रमुख केतन पाटील, व्यापारी आघाडीचे सुरेश पाटील यांनी दिला.