अनिकेत साठे

जळगाव शहरातील जोशी पेठ, भवानी आणि बालाजी पेठ परिसरात कारागीरांना एखादी खोली मिळवून देण्यासाठी सराफी व्यावसायिकांना घरमालकांकडे बराच पाठपुरावा करायला लागायचा. गटागटाने एकत्र राहणारे हे कारागीर एका खोलीसाठी १० ते १२ हजार रुपये मोजायचे. तरीदेखील खोली लवकर मिळत नव्हती. आज त्या परिसरात कुणी खोलीची विचारणा केली तर आठ, दहा घरमालक पुढे येतात. घरभाडे कमी करण्याची तयारी दाखवतात. देशभरातील ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या जळगावच्या सुवर्णनगरीत दागिने घडविण्याचे काम करणारे हजारो बंगाली कारागीर निर्बंध लागू झाल्यानंतर गावी निघून गेले. अस्थिरतेच्या सावटामुळे ते परतण्याची शक्यता धूसर आहे. याची झळ कलाकुसरच्या दागिन्यांच्या निर्मितीला बसणार आहे.

दीडशे वर्षांहून अधिकची परंपरा लाभलेली जळगावची सराफ बाजारपेठ देशातील सर्वात जुन्या बाजारपेठेत ओळखली जाते. जळगाव शहरात नोंदणीकृत १११ सराफी पेढ्या आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही दिवसांपूर्वी शासनाने जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद केली होती. तेव्हाच टाळेबंदीचे संकेत मिळाले. हाती काम नसल्याने कारागीरांना गावचा रस्ता पकडणे भाग पडले. निर्बंधांमुळे सलग दोन वर्ष सराफ बाजारातील उलाढाल थंडावलेली आहे. किमान सणोत्सवात परवानगी मिळण्याची अपेक्षा व्यावसायिक बाळगून होते. पण, त्यांचा भ्रमनिरास झाला. करोनाच्या संकटाने सराफी पेढ्यांच्या अडचणींमध्ये भर पडत आहे. कोट्यवधींची उलाढाल होणारा हा संपूर्ण व्यवसाय ठप्प झाल्याचा विपरित परिणाम जळगावच्या अर्थकारणावर होत आहे. जळगावच्या सराफ बाजाराची काही वैशिष्ट्ये आहेत. मजुरीचे दर तुलनेत कमी आहेत. जुने दागिने देऊन नवीन दागिना खरेदी करावयाचा असल्यास घटणावळ कमी पकडली जाते. दागिन्यांचे नवीनतम प्रकार, सोने देण्या-घेण्याचे चोख व्यवहार यावर व्यावसायिकांचा भर असतो. सराफी पेढ्यांमध्ये तब्बल सहा ते सात हजार कारागीर दागिने घडविण्याचे काम करायचे. त्यामध्ये सर्वाधिक कारागीर पश्चिम बंगालचे होते. चांगला कारागीर हातचा जाऊ नये म्हणून व्यावसायिक त्याच्या निवास व्यवस्थेची काळजी घ्यायचे. हजारो कारागीरांच्या वास्तव्यामुळे जळगाव शहरातील काही भागात घरभाडे गगनाला भिडले होते. नव्या निर्बंधामुळे शहराचे अर्थचक्र दोलायमान बनले आहे.

मागील वर्षी टाळेबंदीत जे घडले, त्याची सध्या पुनरावृत्ती होत आहे. कामातील अस्थिरता, वेतन वेळेवर मिळेल की नाही याची धास्ती, घरापासून दूर राहायला लागणे यामुळे कारागीर निघून गेले. कलाकुसरीचे दागिने घडविणे हे कौशल्याचे काम. कुशल कारागिरांना आपल्या भवितव्याविषयी चिंता होती. त्यामुळे मागील वर्षी गावाला गेलेल्या काहींनी बंगालमध्ये कपड्यावर जरीकाम, कुंदनकाम करायला सुरुवात केली. स्थानिक पातळीवर शाश्वत रोजगार मिळाल्याने अनेक जण पुन्हा परतण्याच्या मानसिकतेत नसल्याचे सराफ व्यावसायिक सांगतात. त्यामुळे यावेळी निघून गेलेल्या कारागीरांविषयी संभ्रम आहे. सध्या सराफी पेढ्या बंद आहेत. त्यांची उणीव लगेच लक्षात येणार नाही. पुढील काळात कुशल कारागिरांची वानवा जळगावसह नाशिक, मुंबईतील सराफी पेढ्यांना जाणवणार आहे.

जळगावमध्ये कलाकुसरीच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. टाळेबंदीच्या सावटामुळे पुन्हा मोठ्या संख्येने कारागीर बंगालमध्ये निघून गेले. याचा पश्चिम बंगालमधील निवडणुकीशी संबंध नाही. मध्यंतरीच्या काळात वेगवेगळ्या कारणांनी सराफ व्यवसायावर परिणाम झाला. तेव्हापासून कारागीरांची गावाकडे परतण्याची मानसिकता वाढू लागली. कामातील अस्थिरतेमुळे ते परततील की नाही हे सांगता येणार नाही. कुशल कारागीर नसल्यास दागिने निर्मितीचे प्रमाण कमी होईल.

– अजय ललवाणी (अध्यक्ष, जळगाव सराफ व्यावसायिक संघटना)