फुलांची उधळण करून रुग्णालयातून निरोप
मालेगाव : काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे करोनाचे केंद्र बनलेल्या मालेगावकरांसाठी रविवारी एक सुखद घटना घडली. येथे उपचार घेत असलेले तीन करोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने आणि त्यांचे दोन तपासणी अहवाल नकारात्मक आल्याने रविवारी सायंकाळी मन्सुरा कॉलेज हॉस्पिटलमधून त्यांना घरी जाऊ देण्यात आले. यावेळी फुलांची उधळण करत या तिघा रुग्णांना शुभेच्छा देण्यात आल्या.
आठ एप्रिल रोजी मालेगाव येथे प्रथम पाच करूनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी हे तिघे आता बरे झाले आहेत. त्यांना निरोप देण्यासाठी कृषिमंत्री दादा भुसे, महापौर ताहेरा शेख, उपायुक्त नितीन कापडणीस, माजी महापौर रशीद शेख आदी उपस्थित होते. या तिघांमध्ये शहरातील मदिना नगर येथील ४५ वर्षांची महिला, खुशामतपुरा येथील ३५ वर्षांची महिला आणि चांदवड येथील २७ वर्षांच्या तरुणाचा समावेश आहे. प्रबळ इच्छाशक्ती व मानसिक स्वास्थ्य चांगले असल्यास करोनावर नक्की मात करता येते, अशी प्रतिRिया यावेळी बरा झालेल्या चांदवड येथील तरुणाने व्यक्त केली. अनेकदा करोनाबाधित रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होतात, त्यामुळे गुंतागुंत निर्माण होते. त्यामुळे लोकांनी करोनाची लक्षणे दिसल्यावर कुठलीही भीती न बाळगता रुग्णालयात तातडीने दाखल व्हावे असा सल्लाही या तरुणाने दिला. रुग्णालयीन सेवेचेही या रुग्णांनी कौतुक केले. मार्चच्या तिसऱ्या आठवडय़ापासून येथील सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात करोना संशयितांवर उपचार सुरू झाले होते. त्यानंतर आठ एप्रिल रोजी पहिल्यांदा पाच करोना बाधित रुग्ण आढळून आले. यानंतर दिवसागणिक या रुग्णांमध्ये वाढ होऊन संख्या १२६ वर पोहचली. तसेच करोना संसर्गामुळे आतापर्यंत १२ जणांना जीव गमवावा लागल्याची सरकारी आकडेवारी आहे.