शहर परिसरात फसवणूक, दुचाकी चोरी, तसेच घरफोडीत चोरटय़ांनी सुमारे साडेसात लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला असल्याची तक्रार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत दाखल आहे.
दत्तमंदिर रस्त्यावरील गायकवाड मळा येथील वसंत इंगोले (५०) यांनी दिलेल्या तक्रारीत संशयित विजय दोंदे (५०, रा. नाशिकरोड) याने त्यांच्याशी ओळख करून मैत्री केली. मैत्रीच्या विश्वासातून इंगोले यांनी आपले पाच लाखांचे चारचाकी वाहन दोंदे यांना घरगुती वापरासाठी दिले. इंगोले यांच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता संशयित दोंदेने वाहनाची परस्पर विक्री केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर इंगोले यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी घटना देवळाली कॅम्प येथे घडली. ‘मातोश्री’ बंगल्यासमोर उभी असलेली आतिश डोंगरे यांची सव्वालाखाची बुलेट चोरण्यात आली. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजून एका घटनेत कॉलेज रोडवरील सिग्नलजवळ तोतले कॉमर्स अकाऊंट क्लासेसच्या खाली मोकळ्या जागेत उभी केलेली दुचाकी चोरटय़ांनी लंपास केल्याची तक्रार गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे
गडकरी चौकातील आयकर भवनच्या इमारतीतून चोरटय़ाने २० हजार किमतीचे चार ते पाच फुटांचे गज लंपास केले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
इंदिरानगर परिसरातील पाथर्डी फाटा रस्त्यावर सूर्य बंगला आहे. येथे राजेश जाधव कुटुंबासमवेत राहतात. जाधव यांच्या बंद घराच्या खिडकीतून हात घालून चोरटय़ाने १२ हजार रुपयांचा भ्रमणध्वनी चोरल्याची तक्रार इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. घरफोडीचाही एक गुन्हा आहे.
गंगापूर रोडवरील शिवाजीनगरातील मीनाताई गार्डनजवळील सप्तशृंगी मंदिरासमोर अजय घोरपडे यांच्या नातेवाईकांच्या घरातील ६० हजार रुपयांचा ऐवज चोरण्यात आल्याची तक्रार घोरपडे यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.