नाशिक – जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.दिंडोरी तालुक्यातील टिलु लांडे (४०, रा.पवारवाडी) हे गुलाब लांडे यांच्याबरोबर वाघाड धरण परिसरात मासेमारी करण्यासाठी गेले होते. मासे पकडण्यासाठी धरणात टाकलेले जाळे काढण्यासाठी टिलु यांनी उडी घेतली. बराच वेळ होऊनही ते बाहेर आले नाहीत. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्यावर अग्निशमन विभागाच्या मदतीने त्यांचा शोध घेण्यात आला. मृतदेह सापडल्यावर दिंडोरी रुग्णालयात नेण्यात आला. दिंडोरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत लौकिक जाधव (१६) हा विहिरीत पडला. लौकिक विहिरीत पडल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने बाहेर काढून वडाळीभोई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तिसऱ्या घटनेत, कैलास ठाकरे (३४) दारूच्या नशेत विहिरीजवळून जात असतांना तोल जाऊन विहिरीत पडला. नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

लासलगाव पोलीस ठाण्यातंर्गत येत असलेल्या पाचोरे येथील प्रथमेश हरगांवकर (१७) हा शेताजवळ काम करत असताना त्याचा वडिलांशी अभ्यासावरून वाद झाला. त्यानंतर तो घरी परत न आल्याने शोध घेतला असता शेतातील विहिरीत मयत अवस्थेत आढळला. वडील रागावल्याने त्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three people drowned in different incidents in nashik district amy
First published on: 31-03-2024 at 17:21 IST