नाटय़ महोत्सवाची प्राथमिक फेरी
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नाशिक विभागातर्फे ६३ व्या नाटय़ महोत्सवाची प्राथमिक फेरी चार ते ३१ जानेवारी या कालावधीत येथील महाकवी कालिदास कलामंदीरात होणार आहे. या स्पर्धेत नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार व अहमदनगर या जिल्ह्य़ात कार्यरत कामगार कल्याण भवन, ललित कला भवन आणि कामगार केद्रातील एकूण १९ नाटय़ संघांनी प्रवेश नोंदविला आहे. या फेरीतील प्रथण व द्वितीय क्रमांकाचे नाटक औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. स्पर्धेचे उद््घाटन आ. सीमा हिरे यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी पाच वाजता महाकवी कालिदास कलामंदीरात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय नाटय़ परिशद शाखेचे अध्यक्ष रवींद्र कदम हे असतील. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या सदस्या संजीवनी सिसोदे आणि कल्याण आयुक्त सुरेखा जाधव उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सत्रात जळगाव येथील कामगार कल्याण केंद्राचे ‘हयवदन’ हे नाटक सादर होणार आहे. नाशिककरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक कल्याण आयुक्त संजय धुमाळ यांनी केले आहे.

अवैध मद्यसाठा जप्त
वार्ताहर, नंदुरबार
अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठी राजमोडी गावात अवैध मद्यसाठय़ासह एकूण १३ लाख ५१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी शनिवारी मोठी राजमोडी गावात छापा टाकून लपविण्यात आलेले तीन लाख ४३ हजार किंमतीचे मद्याचे १३० खोके आणि १० लाख आठ हजार रुपये किंमतीचे चोरीचे २१० खोके जप्त केले. एकूण १३ लाख ५१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.