जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत ट्रम्प टॅरिफच्या प्रभावामुळे मंगळवारी सोने आणि चांदी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले होते. मात्र, नंतरच्या दरात दोन दिवसात मोठी घट दोन्ही धातुंच्या किमतीत झाली आहे. ग्राहकांसह व्यावसायिकांना त्यामुळे काहीअंशी दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

फेडरल रिझर्व्हच्या महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णयापूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणुकदारांमध्ये मोठी सावधगिरी दिसून येत आहे. नफा नोंदणीच्या हालचालींमुळे सुवर्ण बाजारपेठेवरील दबाव वाढला असून, सोन्याचे भाव त्यामुळेच घसरले आहेत. गुंतवणूकदार फक्त व्याजदर कपातीच्या शक्यतेवर नाही तर फेडकडून येणाऱ्या आगामी धोरणात्मक संकेतांवरही बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तज्ज्ञांच्या मते, जर फेडरल रिझर्व्हने स्पष्ट धोरणात्मक मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली नाहीत आणि त्याऐवजी तटस्थ किंवा कमी कडक भूमिकेची चिन्हे दाखवली, तर सोन्याच्या दरात आणखी काही टक्के घसरण होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदार सावध पवित्रा घेऊन व्यापार करत आहेत.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीनंतर देशांतर्गत बाजारातही बुधवारी सोने आणि चांदीने नवे उच्चांक गाठले होते. मात्र, फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या बैठकीपूर्वी गुंतवणुकदारांनी जोखीम कमी करण्यासाठी विक्रीचा मार्ग स्वीकारल्याने दोन्ही धातूंमध्ये आता मोठी घसरण झाली आहे. डॉलर आणि अमेरिकन बाँड यील्डमध्ये होणाऱ्या चढ-उताराचाही सोन्या-चांदीच्या किमतींवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. विशेषत: अमेरिकन महागाईचे आकडे तसेच रोजगार बाजारातील घडामोडी आणि फेडच्या भाष्यामुळे सोन्याच्या दरात पुढील काही दिवसांत चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, फेड धोरण जाहीर झाल्यानंतर बाजाराची स्पष्ट दिशा ठरू शकेल.

जळगावमध्ये मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख १४ हजार ८४५ रूपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचले होते. मात्र, बुधवारी दिवसभरात ८२४ रूपयांची घट नोंदवली गेल्याने सोन्याचे दर एक लाख १४ हजार २१ रूपयांपर्यंत घसरले. गुरूवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा ५१५ रूपयांनी घट नोंदवली गेल्याने सोन्याचे दर एक लाख १३ हजार ५०६ रूपयांपर्यंत खाली आले. सोन्यात दोनच दिवसात तब्बल १३३९ रूपयांनी घट झाली.

चांदीत ४१२० रूपयांनी घट

जळगावमध्ये मंगळवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ३४ हजार ९३० रूपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचले होते. बुधवारी तब्बल २०६० रूपयांची घट नोंदवली गेल्याने चांदीचे दर एक लाख ३१ हजार ८४० रूपयांपर्यंत खाली आले. गुरूवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा १०३० रूपयांची घट नोंदवली गेल्याने चांदी प्रति किलो एक लाख ३० हजार ८१० रूपयांपर्यंत घसरली. चांदीत दोनच दिवसात ४१२० रूपयांची घट झाली.