रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी दुचाकीस्वारांनी वाहन चालविताना शिरस्त्राण अर्थात हेल्मेट वापरणे, तसेच चारचाकी वाहनचालकांसाठी आसनबंध (सीटबेल्ट) वापरणे उच्च न्यायालयाने अनिवार्य केले आहे. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करताना वाहतूक पोलिसांना वाहनधारकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. यामुळे तूर्तास वाहनधारकांच्या समुपदेशनावर भर दिला गेला असून, कारवाई करणाऱ्या पोलिसांनी या नियमांचे पालन करावे, असा प्रयत्न केला जात आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिरस्त्राण आणि आसनबंध न वापरणाऱ्यांवर सोमवारपासून कारवाई सुरू करण्यात आली. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिसांनी काही ठिकाणी दंडात्मक कारवाई केली. परंतु ती करताना पोलिसांना वेगळ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शिरस्त्राण न घालणाऱ्या एखाद्या चालकाला सिग्नलवर रोखले तर त्यांच्याकडून आसपासच्या इतरांनाही पकडा असे सांगितले जाते. वाहतूक पोलीस शाखेची सात झेब्रा मोबाइल वाहने (दुचाकी) आहेत. त्याद्वारे वाहतूक पोलीस कोणत्याही भागात जाऊन कारवाई सुरू करतात. परंतु, शिरस्त्राणाबाबत कारवाई करताना वाहनधारक तुमच्याकडे शिरस्त्राण आहे काय, असा प्रश्न करत असल्याची अनुभूती येत आहे. ही बाब लक्षात आल्यावर संबंधितांना प्रत्येकी एक शिरस्त्राणही उपलब्ध करून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. पहिल्या दहा ते पंधरा दिवसात वाहनचालकांच्या समुपदेशनावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शिरस्त्राण परिधान न करणे, आसनबंधाचा वापर न करणे कसे धोकादायक ठरू शकते याची जाणीव संबंधितांना करून दिली जात आहे. जनजागृतीचा कालावधी संपुष्टात आल्यावर धडक कारवाई सुरू केली जाईल, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. वाहतूक पोलीस शाखेतील कर्मचाऱ्यांनी शिरस्त्राणाचा वापर करावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाच्या दोन पथकांनी मंगळवारी नाशिक-दिंडोरी, नाशिक-त्र्यंबक रस्त्यांवर कारवाई केल्याचे या विभागाचे प्रमुख जीवन बनसोड यांनी सांगितले.
या विभागाकडे मुळात मनुष्यबळ कमी आहे. शिरस्त्राण परिधान न करणे अथवा आसनबंधाचा वापर न करणाऱ्यांवर कारवाईसाठी चार अधिकाऱ्यांचा समावेश असणारी दोन पथके कार्यरत आहेत. त्यांच्याकडून कितपत कारवाईची अपेक्षा करणार, असाही प्रश्न आहे.