धुळे – पोलीस भरतीसाठी आलेली तृतीयपंथीय चांद तडवीची शुक्रवारी सकाळी येथील पोलीस कवायत मैदानात शारीरिक आणि मैदानी चाचणी घेण्यात आली. याआधी राज्य शासनाकडून तृतीपंथींयासंदर्भात शारीरिक चाचणीचे धोरण आणि निकष ठरले नसल्याने चाचणी न देताच चांदला निराश होऊन परतावे लागले होते. शारीरिक आणि मैदानी चाचणी झाल्यानंतर चांदच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
राज्य शासनाने पोलीस भरतीत तृतीयपंथीयांसाठी आरक्षण जाहीर केल्याने चांद तडवी उर्फ बेबो जोगी (२७, सोयगाव, औरंगाबाद) हिने येथे पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल केला होता. फेब्रुवारीत भरती प्रक्रियेवेळी कागदपत्र पडताळणीसह तिला पुढील फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. परंतु, राज्य शासनाकडून तृतीय पंथियांसाठी शारीरिक मोजमापाचे तसेच मैदानी चाचणीचे निकष कोणते असावेत, याबाबत कुठलेही धोरण ठरले नव्हते. यामुळे चांदला राज्य शासनाचे धोरण जाहीर झाल्यानंतर बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
हेही वाचा – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे ३०८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर
हेही वाचा – नंदुरबार जिल्ह्यात जोरदार गारपीट; शेतकऱ्यांना मार्चमध्ये दुसऱ्यांदा फटका, पाहा व्हिडिओ
राज्य शासनाकडून तृतीयपंथीयांसाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर झाल्यानंतर चांदला शुक्रवारी सकाळी पुढील प्रक्रियेसाठी धुळे येथे बोलविण्यात आले होते. चांदने निकषानुसार सर्व प्रक्रिया पार पाडली. शारीरिक तसेच मैदानी चाचणीही झाली. पोलीस कवायत मैदानावर तिच्या एकटीच्या चाचणीसाठी पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक संभाजी पाटील, निरीक्षक पावरा यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तिला सर्व अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी धीर दिला. आता तिला लेखी परीक्षेसाठी बोलविण्यात येणार असल्याने चेहऱ्यावर समाधान दिसून आले.