जळगाव – सामाजिक शांततेला बाधा ठरू पाहणार्‍या आणि गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या दोघांना पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. आशुतोष ऊर्फ आशू  मोरे (२१, रा. एकनाथनगर, रामेश्‍वर कॉलनी) व दीक्षांत ऊर्फ दादू सपकाळे (१९, रा. यादव देवचंद विद्यालयाजवळ, मेहरुण) अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, तालुक्यातील शिरसोलीतून दुचाकी चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

हेही वाचा >>> नाशिक : प्रतिबंधित प्लास्टिक प्रकरणी १४ जणांवर कारवाई

शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी टोळीने दहशत पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचे काम हे दोन्ही गुन्हेगार करीत होते. दोघांविरुद्ध एमआयडीसी व शनिपेठ पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे आठ गुन्हे दाखल आहेत. जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल असून, त्यांच्यामुळे जनतेच्या जीविताला व मालमत्तेला मोठा धोका निर्माण झाला आहे, असे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांना हद्दपार करण्याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सय्यद, साईनाथ मुंडे, जमील शेख, इम्तियाज खान यांच्या माध्यमातून हद्दपारीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यासंदर्भातील कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांनी करीत प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर केला. चौकशीअंती दोघा संशयितांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश काढण्यात आले.

हेही वाचा >>> नाशिक: मुद्रणालयात २१ मृत कामगारांच्या वारसांना नोकरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुचाकी चोरटा पोलिसांच्या हाती

दरम्यान, दुचाकी चोरीनंतर फरार भामट्याला एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आकाश  नागपुरे (१९, रा. शिरसोली, ता. जळगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. शिरसोली येथील जळके पाटील गल्लीतील विठ्ठल मंदिराजवळ राहणारे किरण  चिमणकारे यांची दुचाकी २४ जूनला चोरी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दुचाकी शिरसोली येथील आकाश नागपुरे याने चोरल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळताच त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, गुन्हे शोधपथकातील सहायक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, हवालदार गणेश शिरसाळे आदींनी आकाश नागपुरेला गावातच बेड्या ठोकल्या. विकास सातदिवे तपास करीत आहेत.