पेठ, सुरगाण्यात वाढ; पाच तालुक्यात निम्म्याने घट

नाशिक : ऑगस्ट महिन्याचा शेवट होण्याच्या मार्गावर असताना आतापर्यंत जिल्ह्यात ९८९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण ११९४५ मिलीमीटर इतके होते. गेल्या वर्षीचा विचार करता या वर्षी पावसात २०५२ मिलीमीटरने घट झाली आहे. तसेच गेल्या वर्षी पावसाने संपूर्ण जिल्हा व्यापला होता. यंदा विपरीत स्थिती आहे. नाशिक, मालेगाव, चांदवड, बागलाण, सिन्नर  या पाच तालुक्यात गतवेळच्या तुलनेत निम्मा पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाअभावी नद्या, नाल्यांना पूर आलेला नाही. धरणांचा जलसाठा समाधानकारक स्थितीत पोहोचलेला नाही.

पावसाने पुन्हा उघडीप घेतली आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यत केवळ ५५ मिलीमीटरची नोंद झाली. गेल्या पावणे तीन महिन्यांत जिल्ह्यत पर्जन्यमान कमी राहिले. पुढील काळात यात बदल न झाल्यास गंभीर स्थितीला तोंड द्यावे लागू शकते. जिल्ह्यचे सरासरी  पर्जन्यमान १५ हजार मिलीमीटर आहे. या वर्षी पावसाने सुरुवातीपासून हुलकावणी दिली. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होत असताना स्थानिक पातळीवर तो रिमझिमच्या पलीकडे गेला नाही. अधुनमधून काही तालुक्यात तो कोसळला. त्यामुळे एकूण पावसाची आकडेवारी १० हजार मिलीमीटपर्यंत पोहोचली. परंतु, अनेक भाग आजही मुसळधार पावसापासून वंचित आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत बहुतांश भागात पावसाचे प्रमाण घटले. इगतपुरीत आतापर्यंत २३१७ मिलीमीटरची नोंद झाली आहे. गत वर्षी या तालुक्यात तीन हजार १६ मिलीमीटर पाऊस झाला होता. म्हणजे ७०० मिलीमीटरने कमी पाऊस झाला. पेठ तालुक्यात उलट स्थिती आहे. गेल्या वर्षी तिथे ११७२ मिलीमीटर पाऊस झाला होता. यावेळी हे प्रमाण १४९२ मिलीमीटरवर पोहोचले. त्र्यंबकेश्वर तालुक्यात वेगळी स्थिती नाही. तिथे आतापर्यंत १२७९ (गेल्या वर्षी ११८० मिलीमीटर) पावसाची नोंद आहे. सुरगाण्यात पावसाचे प्रमाण वाढले. या तालुक्यात आतापर्यंत १४३० (१०४६ मिलीमीटर) पाऊस पडला.

हे तालुके वगळता उर्वरित भागात बिकट स्थिती आहे. नाशिक तालुक्यात आतापर्यंत २७७ (गेल्या वर्षी ५५७), दिंडोरी ३४८ (४४०), मालेगाव ३२७ (६३३), नांदगाव ३६५ (५३५), चांदवड १७४ (३९५), कळवण ३५० (४५६), बागलाण ३१६ (६५६), देवळा ३१७ (४१८), निफाड ३५७ (३८०), सिन्नर २४३ (६२२) आणि येवला तालुक्यात ३०० (४३६) मिलीमीटर पाऊस झाला. पाच तालुक्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला आहे.

गंगापूरमध्ये ९० टक्के जलसाठा

पुरेशा पावसाअभावी जलसाठय़ावर परिणाम झाला आहे. गतवर्षी २३ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यतील धरणांमध्ये ४७ हजार २७७ दशलक्ष घनफूट म्हणजे ७२ टक्के जलसाठा होता. यंदा हे प्रमाण ४१ हजार ५८९ दशलक्ष घनफूट म्हणजे ६३ टक्क्यांवर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जलसाठा नऊ टक्क्यांनी कमी आहे. करंजवण, ओझरखेड, गिरणा, नागासाक्या, तिसगाव ही धरणे अद्याप निम्मी देखील भरू शकली नाही. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरमधील जलसाठा सोमवारी ९० टक्क्यांवर पोहोचला. त्र्यंबकेश्वरमधील पावसामुळे धरण साठय़ात भर पडत आहे. सध्या आळंदी, दारणा, भावली, नांदूरमध्यमेश्वर, हरणबारीमधून विसर्ग सोडण्यात आला आहे.