दोन्ही गटांकडून परस्परांवर दगडफेक; भाजप कार्यालयाची तोडफोड
नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याची बाब स्थानिक पातळीवर शिवसेना-भाजपमधील नव्या धुमश्चक्रीचे कारण ठरले. या प्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतर शिवसैनिकांनी भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयावर दगडफेक केली. त्यास प्रत्युत्तर देण्यास भाजप नगरसेवक, कार्यकर्ते सेना कार्यालयावर चालून गेले. त्यांच्यापैकी काही जणांनीही दगडफेक के ली. शिवसेनेकडून राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या घटनाक्रमामुळे एन. डी. पटेल रस्ता, शालिमार, महाकवी कालिदास कला मंदिर परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण राहिले. व्यावसायिकांना आपली दुकाने बंद ठेवावी लागली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी राणेंनी वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून राणे यांच्याविरुध्द जातीय तेढ निर्माण करणे, द्वेष निर्माण करणे अशा विविध कलमांन्वये सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सकाळी काही सेना नगरसेवक, शिवसैनिक थेट एन.डी. पटेल रस्त्यावरील वसंत स्मृती या भाजपच्या कार्यालयावर धडकले. दगडांचा मारा करीत कार्यालयाच्या दर्शनी भागातील काचा फोडल्या. राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी तातडीने धाव घेत काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले. कार्यालयावर दगडफेक झाल्याचे समजल्यानंतर भाजपचे आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते जमा झाले. काही उत्साही मंडळी सेना कार्यालयाकडे गेली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तथापि, काही जण कालिदास कला मंदिराकडून मार्गस्थ झाली.
सिडकोतील नगरसेवक, कार्यकर्ते सेना कार्यालयाच्या दिशेने दगडफेक करू लागले. ही बाब लक्षात आल्यावर शिवसैनिक रस्त्यावर उतरले. दोन्ही गटांकडून परस्परांवर दगडांचा जोरदार मारा करण्यात आला.
काहींच्या हातात लाठ्या-काठ्यााही होत्या. यावेळी नगरसेवक मुके श शहाणे यांना धक्काबुक्की करण्यात आली. दोन्ही बाजूकडून दगडांचा इतका वर्षाव झाला की, पोलिसांना सुरक्षित जागा शोधावी लागली. नागरिकांसह वाहनधारकांची धावपळ उडाली.
दोन्ही पक्षांमध्ये रणकंदन उडाल्यानंतर सेना, भाजप कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मनपातील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. महिला आघाडीच्या पदाधिकारी सेना कार्यालयाच्या संरक्षणासाठी लाठ्या घेऊन ठाण मांडून बसल्या. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सेना कार्यालयावर दगडफेकीचा प्रयत्न करणाऱ्यांना पिटाळून लावल्याचे सांगितले. असा प्रयत्न करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. एकूणच या प्रकाराने सेना-भाजपमधील वितुष्ट टोकाला पोहचल्याचे अधोरेखीत झाले.
व्यावसायिकांना फटका
सलग काही तास चाललेल्या धुमश्चक्रीमुळे मध्यवर्ती बाजारपेठ परिसरात तणावाचे वातावरण होते. दगडफेकीमुळे शालिमार, एन.डी. पटेल रस्ता परिसरातील दुकाने व्यापाऱ्यांनी बंद केली. वाहनधारक, पादचारी, रस्त्यावरील विक्रेते यांची धावपळ उडाली. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविला गेला. शालिमार येथील सेना कार्यालयाबाहेर पदाधिकाऱ्यांच्या वाहनांची गर्दी झाली होती. यामुळे या भागातून वाहनधारकांना मार्गस्थ होणे अवघड झाले.
कठोर कारवाई करणार
कुणालाही कायदा हाती घेण्याचा अधिकार नाही. कुठल्याही राजकीय पक्षांच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाई केली जाईल. संशयित राजकीय पक्षांशी संबंधित असले तरी कायदा हातात घेणारे गुंडप्रवृत्तीचे आहेत असे गृहीत धरले जाईल. त्यांना अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल. अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गरज भासल्यास पोलीस बळाचाही वापर करतील. – दीपक पाण्ड्ये (पोलीस आयुक्त, नाशिक)