महिला वर्गाची सुरक्षा, वृद्ध व लहान मुलांचे संरक्षण, असे उपक्रम ‘पोलीस मित्र’ संकल्पनेतून साकार करण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय मोहिते हे एकीकडे प्रयत्न करीत असले तरी त्यासाठी त्यांना प्रत्येक पोलीस ठाण्यातून सहकार्य मिळणे आवश्यक आहे. परंतु, तसे होताना सध्यातरी दिसत नाही. दिंडोरी तालुक्यातील वणी पोलीस ठाण्याचेच उदाहरण त्यासाठी पुरेसे ठरावे. वणी पोलिसांवर सर्वसामान्य नागरिकांपेक्षा गुंडांचा इतका विश्वास आहे की, त्या विश्वासामुळे ते सर्वत्र यथेच्छपणे धिंगाणा घालू शकतात. वणी बस स्थानक म्हणजे जणूकाही गुंडांचा अड्डाच झाला असून सायंकाळनंतर या स्थानकात येणाऱ्या किंवा थांबणाऱ्यांची गुंडांच्या तावडीतून सुटका होणे मुश्किल, अशी येथील परिस्थिती आहे.
वणी पोलीस ठाण्याचे ‘पालकत्व’ महिन्यापूर्वी नवीन अधिकाऱ्यांनी हाती घेतली. अर्थात हे पालकत्व वेगळ्या स्वरूपाचे असले तरी पालकत्व कोणतेही असले तरी टीका वाटय़ाला येतेच याचा अनुभव जिल्ह्य़ाचे पालकत्व सांभाळणाऱ्या गिरीश महाजन यांनाही येतच आहे. असे असताना तो आपल्या वाटय़ाला येत असल्यास ते आपले भाग्य की काय, असे कदाचित नवीन अधिकारी समजत असावेत. या ठाण्याअंतर्गत गतकाळातील व विद्यमान घटनांचा उल्लेख आवर्जुन करणे क्रमप्राप्त ठरते. वणी व परिसरात असामाजिक प्रवृत्तीचे प्राबल्य वाढले असून प्रशासनाला संघटितपणे वेठीस धरणाऱ्या या घटकांचा प्रभाव वणीच्या शांततेला बाधा पोहचविणारा ठरू शकतो. शैक्षणिक संस्थांचा परिसर व इतर ठिकाणी खुलेआम अंमली पदार्थ उपलब्ध होत असल्याची चर्चा आहे. शाळकरी मुले गुटखा खाताना दिसतात. मटका, दारू, जुगार, सोरट, अशा अनेक बेकायदेसीर व्यवसायांनी कळस गाठला आहे. या सर्व प्रकारांना कोणी विरोध केल्यास अवैध व्यावसायिकांना हाताशी धरून पोलीस खोटे गुन्हे दाखल करावयास मागेपुढे पाहत नाहीत. यावरूनच पोलिसांवर असलेला गुंडांचा प्रभाव लक्षात येईल. वणीमध्ये गुंडांना पोलिसांची भीती वाटण्याऐवजी पोलिसांनाच गुंडांची भीती वाटते. चार महिन्यापासून पेठ येथे बदली झालेला पोलीस कर्मचारी अजूनही वणीत काय करतो, याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही. वणी बिटाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसाला काही ठिकाणी प्रसाद मिळाल्याच्या कथा आहेत. पोलीस दलातील अंतर्गत गटबाजीचा त्रास कधी सामान्यांनाही होतो. तक्रारीची दखल न घेणे, माहिती अधिकाराचे अर्ज न स्वीकारणे, अशा एक ना अनेक तक्रारदाराला आरोपींच्या पिजऱ्यात उभे करण्याच्या कला खाकीच्या अंगात आहेत.
माळे दुमाला येथील पेट्रोल पंपावर पडलेल्या दरोडय़ास बराच कालावधी लोटला तरी तपास अजून सुरूच आहे. आठवडे बाजारात पैशांची पाकिटे व भ्रमणध्वनी चोरणारी टोळी पोलिसांना सापडत नाही. रात्री-अपरात्री चौकाचौकात बसणाऱ्या टारगटाकडे पोलिसांची डोळेझाक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेडछाड याबरोबर भुरटय़ा चोरांनी मांडलेला उच्छाद, पांढरपेक्षा गुन्हेगारांना अप्रत्यक्ष संरक्षण, या बाबी सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या आहेत. अलिकडेच एका तृतीयपंथीयावर अत्याचार करून सोन्याची पोत ओरबाडण्याचा प्रकार घडला. रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे पीडित तृतीयपंथीयाने म्हटले आहे. बस स्थानक परिसरात तृतीयपंथीयही सुरक्षीत नाही तर महिलांचे काय? काही विशिष्ट घटकांकडून गुंडगिरीला प्रोत्साहन दिले जात आहे. बस स्थानकावर एकटय़ा-दुकटय़ा महिलेची छेड काढणे हे प्रकार तर नित्याचे झाले आहेत. विशेषत: ग्रामीण भागात अशा प्रकारांविरोधात संपूर्ण गाव एक होत असते. परंतु, वणीमध्ये मात्र अजून तरी तसे झालेले नाही. त्यामुळे गुंडांना रान मोकळे मिळत असल्याची चर्चा आहे.
परराज्यातील भाविकांच्या गाडय़ा अडवून त्रास देणे, काळ्या बाजारातील धान्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांना मोकळीक, रस्त्यावर वाहतुकीची कोंडी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष, अशा प्रकारच्या समस्या कायमच्या आहेत. शालेय व महाविद्यालयीन संस्थांमध्ये बंदोबस्त, बस स्थानक परिसरात गस्त, तसेच गुन्हेगारी वृत्तीवर कडक कारवाई करण्याचे मत सरपंच मधुकर भरसठ, उपसरपंच किरण गांगुर्डे यांनी व्यक्त केले असले तरी या मताप्रमाणे कार्यवाही करण्यात ते टाळाटाळ करीत असल्याचे वास्तव किसनलालजी बोरा इंग्लिश मीडियम स्कुल संस्थेचे अध्यक्ष महेंद्र बोरा यांनी मांडले आहे. तीन ते चार महिन्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक होऊन त्यात बस स्थानक, ग्रामीण रूग्णालय यांसह इतर काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे पालिकेने बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासंदर्भात अद्यापही कार्यवाही झालेली नाही. ही कार्यवाही त्वरीत झाली असती तर शहरात घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमधील सहभागी असणाऱ्यांची ओळख पटण्यास मदत झाली असती आणि पोलिसांनाही ते मदतीचे ठरले असते, असे बोरा यांनी नमूद केले.
संताजी इंग्लिश मीडियम स्कुल संस्थेचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पारख यांनी रात्री बस स्थानकात गाडय़ा येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे स्थानकात कोणी प्रवासी आल्यास काही गुंडांकडून त्यांना अंधारात नेवून लुटमार करणे, महिलांची छेड काढणे असे प्रकार घडतात. असे प्रकार रोखण्याचा प्रयत्न आपल्या सहकाऱ्यांनी काही वेळा केला. परंतु, सदैव हे शक्य नसल्याने पोलिसांनी किंवा परिवहन महामंडलाने स्थानकात सुरक्षारक्षक नेमण्याची गरज आहे, अशी सूचना त्यांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2015 रोजी प्रकाशित
वणी: जिथे गुंडांना पोलीस घाबरतात..
वणी पोलीस ठाण्याचे ‘पालकत्व’ महिन्यापूर्वी नवीन अधिकाऱ्यांनी हाती घेतली.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद

First published on: 12-11-2015 at 04:19 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vani a palace where the police are afraid with gangster