‘अभिव्यक्ती’तर्फे त्र्यंबकेश्वर तालुक्यात सर्वेक्षण
चारुशीला कुलकर्णी
नाशिक : करोनाकाळात टाळेबंदीमुळे सर्व दैनंदिन व्यवहार बंद असताना अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट संस्थेने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील १२ गावांमध्ये पथकाद्वारे गावांमधील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यात गावात लसीकरण न होणे, शासकीय योजना तसेच आरोग्य सुविधांची माहिती लोकांपर्यंत न पोहचणे, अशा गंभीर बाबी आढळून आल्या. करोनाच्या दुसऱ्या लाटेत गावात झालेले लसीकरण, रोजगार, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा आणि आदिवासींसाठी असणाऱ्या योजना याचा अभ्यास या कालावधीत करण्यात आला.
करोनाकाळात लागु झालेल्या टाळेबंदीचा परिणाम सर्व क्षेत्रांवर झाला. अभिव्यक्ती संस्था आणि गावातील लोक यामध्ये दुवा म्हणून काम करणाऱ्या आणि शोधिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशोरवयीन मुलीही गावात अडकल्या. टाळेबंदीकाळात शिक्षण, रोजगार, मानसिक आरोग्य या समस्या भेडसावत असताना कमी खर्चात मुलींची लग्ने कमी वयातच लावण्यात येत असल्याचे या शोधिणींच्या लक्षात आले. मुलींच्या आयुष्यावर टाळेबंदीचा काय परिणाम झाला याचा अभ्यास झाला. पुढील टप्प्यात शोधिणींनी कृती संशोधनाचा आधार घेत दुसऱ्या लाटेत नाशिक ग्रामीणमध्ये लसीकरणाची आणि इतर आरोग्य सुविधांची काय स्थिती राहिली, ते समजावे म्हणून एक सर्वेक्षण केले. यासाठी शोधिणींना त्यांचे भाऊ आणि अन्य सहकारी अशा ६० हून अधिक किशोरवयीन मुले आणि मुलींची साथ लाभली.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने, सापगाव, शिरसगाव, धुमोडी, अंबई, वाघेरासह अन्य १२ गावांमध्ये लसीकरण, आरोग्य सुविधा याविषयी सर्वेक्षण करण्यात आले. गावात लसीकरणाची काय परिस्थती, गावात रोजगाराची काय स्थिती, खावटी योजनेचा लाभ किती जण घेतात आणि गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात असणाऱ्या सुविधा याची माहिती संकलित करण्यात आली. १२ गावांतील ३२४ घरांमधून ही माहिती गोळा केली. यामध्ये ३२४ पैकी केवळ ८९ लोकांनी करोना प्रतिबंधात्मक लस घेतल्याचे उघड झाले. अन्य लोकांमध्ये लसीकरणाविषयी अंधश्रध्दा, गैरसमज आहेत. काही गावांमध्ये लस उपलब्ध नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रातूनही लसीकरणासाठी प्रयत्न होत नसल्याचे दिसले. गावात या अनुषंगाने लसीकरणासाठी शिबीर घेऊन जनजागृतीवर भर देण्याची गरज आहे. वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. गावात केवळ चार टक्के लोकांना खावटी योजनेचा लाभ मिळाला. काहींनी आपण भूमिहीन असल्याचे सांगितले. काहींना खावटी योजनेची माहितीच नाही. ग्रामपंचायतची भूमिका याबाबत उदासीन आहे. ग्रामपंचायत सक्रिय झाल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. रोजगाराची नोंदणी ग्रामसेवकांकडे केवळ ३७ टक्के लोकांनी केली. ग्रामपंचायतीमध्ये कागदपत्रे देऊनसुध्दा काम होत नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. नोंद केली तरी रोजगारकार्ड मिळत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्त, लघवी, थुंकी तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे की नाही ही माहितीच ३७ टक्के लोकांना नाही. हे चित्र बदलण्याची गरज सर्वेक्षणात व्यक्त झाली. यासाठी गाव पातळीवर काय उपाययोजना केल्या पाहिजेत, असा कृती कार्यक्रमही शोधिणी यांनी दिला आहे.
सर्वेक्षण झालेली गावे
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हिरडी, खरवळ, गावठा, बेरवळ, वेळुंजे, गणेशगाव, आडगाव, बेहुडेपाडा, चिरापाली, बोरीपाडा, हातलोंढी या गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. ८९ टक्के लोकांनी करोना प्रतिबंधात्मक लसीकरण केलेले नाही. ९४ टक्के लोकांना खावटी योजनेचा लाभ मिळालेला नाही. ६३ टक्के लोकांनी आरोग्य सेवकाकडे नोंद केलेली नाही आणि ३७ टक्के लोकांना प्राथमिक सुविधांची माहिती नसल्याचे सर्वेक्षणात आढळून आले.