स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त भगूर या त्यांच्या मूळ गावी २५ व २६ फेब्रुवारी रोजी आयोजित स्वा. सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे औचित्य साधत सावरकरप्रेमींनी समग्र सावरकर वाड्:मय कोश निर्मितीचा संकल्प सोडला आहे. या कोशाचे सहा विभाग करण्यात आले असून माहिती संकलनाचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत जवळपास एक हजार पृष्ठे हस्तलिखीत मजकूर तयार झाला आहे. सावरकरांवर निर्मिला जाणारा हा देशातील पहिलाच कोश ठरणार असल्याचे संयोजकांचे म्हणणे आहे.
या संमेलनासाठी स्मरणिका संपादित करण्याची जबाबदारी स्वीकारणारे ग्रंथालय व माहितीशास्त्राचे अभ्यासक डॉ. नागेश कांबळे यांनी कोश निर्मिती प्रक्रियेची माहिती दिली. गेल्या वर्षी स्वायत्त मराठी विद्यापीठाच्या लोकार्पण सोहळ्यात या विद्यापीठाचे ‘भाषाप्रभू स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर स्वायत्त मराठी विद्यापीठ’ असे नामकरण भव्यदिव्य सोहळ्यात करण्यात आले होते. त्यातून स्फुर्ती घेऊन समग्र सावरकर वाड्:मय कोश करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळासमोर ठेवल्यावर सर्वानी तो उचलून धरला. कालांतराने स्वातंत्र्यवीरांचे नाव विद्यापीठाला देण्याचा प्रस्ताव बारगळल्याचे सांगितले जाते. तथापि, अशा प्रकारचा संकलित वाड्:मय कोश भारतभर कोणी केल्याचे ऐकिवात नसल्याने या कोशाचे काम आपण सुरू ठेवल्याचे कांबळे यांनी नमूद केले.
या कोशाचे तूर्तास सहा भागात विभाजन केले आहे. त्यात सावरकर लिखीत समग्र ग्रंथ, सावरकर साहित्यविषयक इतर लेखकांचे ग्रंथ, विविध नियतकालिकांनी प्रकाशित केलेले प्रासंगिक विशेषांक व त्यातील लेखांचा तपशील, सावरकरांच्या विविध पैलूंशी निगडीत नियतकालिकांमधील तसेच वृत्तपत्रातील लेखांचा तपशील आणि सावरकरांचे जीवन व साहित्य याच्याशी संबंधित ध्वनीफिती, चित्रफिती आणि अन्य पैलू यांचा समावेश राहणार आहे.
या सर्व विभागात साहित्य संकलनाचे काम सुरू असून तो पूर्णत्वास जाण्यास एक ते दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. सावरकर साहित्यावर संशोधन करू इच्छिणाऱ्या अभ्यासकांना हा
कोश एक महत्वपूर्ण संदर्भसाधन उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे समस्त सावरकरप्रेमींनी आपल्याकडील साहित्याची माहिती कळविल्यास वा देणगी रुपाने उपलब्ध केल्यास हे संकलन पूर्णत्वास जाईल, याकडे कांबळे यांनी लक्ष वेधले.
कागदपत्रे खुली करण्याची मागणी
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रमाणे केंद्र सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी निगडीत संपूर्ण कागदपत्रे खुली करावीत, अशी मागणी सावरकर प्रेमींनी केली आहे. त्या अनुषंगाने संमेलनात ठराव मांडला जाणार असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे.