नाशिक : शहरातील नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सातत्याने पाणी पुरवठा विस्कळीत होणे आणि ‘व्हॉल्व्हमन’ पाणी सोडण्यासाठी भेदभाव करीत असल्याची बाब गंभीर आहे. या भागातील पाणी पुरवठा समतोलपणे सोडण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेला दिले आहेत. आ. सीमा हिरे यांच्या पाठपुराव्यातून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विधीमंडळातील त्यांच्या दालनात शनिवारी बैठकीचे आयोजन केले होते.
प्रारंभीच आ. हिरे यांनी महापालिकेबाबतच्या समस्यांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. अवघ्या दीड वर्षांवर सिंहस्थ कुंभमेळा आला् आहे. तत्पुर्वी सर्वच समस्या सोडवून विकासकामे पूर्ण करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली. बैठकीस उप मुख्यमत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, सहसचिव कैलास बिलोणीकर, नितीन दळवी, नगरविकासचे उप सचिव अजिक्य बगाडे, महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता रविंद्र धारणकर आदी अधिकारी उपस्थित होते. तर महापालिका आयुक्त मनिषा खत्री या दृकश्राव्य माध्यमातून बैठकीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मनपा प्रशासनाला सूचना दिल्या.
बैठकीत पश्चिम विधानसभा मतदारसंघात वाढती अतिक्रमणे, दादासाहेब फाळके स्मारक व पेलिकन पार्कची झालेली दुरावस्था याकडेही लक्ष वेधण्यात आले. पाणी पट्टी वसूलीसाठी विशेष मोहिम राबविणे, महिला बचत गटांच्या विविध उपक्रमांसाठी म्हाडाच्या जागेवर महिला भवनची उभारणी, अंबड येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उभारलेल्या शेडला नियमित करणे, वाहनतळांची निकड, गंगापूर धरणातून थेट जलवाहिनी योजनेच्या कामातील दिरंगाई, भूसंपादन मोबदला देताना शेतकऱ्यांऐवजी विकसकांना मिळणारे प्राधान्य, महापालिकेतील रखडलेली नोकरभरती आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
अधिकाऱ्यांचे क्रमांक जाहीर करा
सिडको, सातपूर, पाथर्डी फाटा परिसरात सतत विस्कळीत होणाऱ्या पाणी पुरवठयाच्या समस्येची तड लावण्यासाठी व्हॉल्व्हमनसाठी नव्याने निविदा काढावी, पाणी वितरणाचे वेळापत्रक तयार करावे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक प्रसिद्ध करण्याची सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पावसाने उसंत घेताच गॅसवाहिनी आणि पावसामुळे उखडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू करावे. यात प्रथम मोठया रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास प्राधान्य देण्यास सांगण्यात आले आहे. अधिकाधिक निधी उपलब्ध करून फाळके स्मारकाची दूरावस्था दूर करावी लागेल. पेलिकन पार्कच्या आधुनिकीकरणासाठी नगरविकास मधूनही निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. पाणीपट्टी,घरपट्टीच्या वसूलीत वाढ होण्यासाठी अभिनव उपक्रम राबवावेत. आयटी पार्क उभारणीच्या प्रस्तावाला गती देण्यासाठी एमआयडीसी सोबत बैठक घेण्याचे सूचित करण्यात आले. भिवंडी पॅटर्नच्या धर्तीवर अंबड येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे शेड नियमित करण्यासाठी प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठविण्याची सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केल्या आहेत.
भू संपादनाचे ३० कोटींचे प्रस्ताव रद्द
शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला गती देण्यासाठी सैन्यातून निवृत्त झालेल्या ६० माजी सैनिकांना कंत्राटी स्वरुपात अतिक्रमण विभागात घेण्यात येणार आहे. भू संपादनापोटी विकसकांना दिलेल्या ५५ कोटीपैकी ३० कोटींचे प्रस्तावच रद्द करण्यात आल्याची माहिती आयुक्त मनिषा खत्री यांनी दिली. महापालिकेतील भरती संदर्भातील आकृतीबंद प्रस्तावास शासनाने मंजूरी दिलेली आहे. बिंदू नामावलीस मान्यता न मिळाल्याने भरती प्रक्रिया रखडल्याची बाब समोर येताच उपमुख्यमंत्र्यांनी सचिव राजेशकुमार यांच्याशी संपर्क साधला. सिंहस्थ जवळ आल्याने महापालिकेत भरती होणे गरजेचे असून बिंदू नामावलीस तातडीने मान्यता देण्याची सूचना केली.