वाहिनीचे झाकण उघडल्याने सिडकोमध्ये हजारो लिटर पाण्याची नासाडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घागरभर पाण्यासाठी कडाडत्या ऊन्हात राज्याच्या कानाकोपऱ्यात मायलेकी वणवण फिरत आहेत; परंतु नाशिक शहरात मात्र मंगळवारी सकाळी चमत्कारच घडला. सिडकोतील उत्तमनगर भागात जलवाहिनीचे झाकण अचानक उघडले आणि आसपासच्या दहा ते १२ घरांमध्ये शिरले; याशिवाय छोटय़ा मोठय़ा गल्लीबोळातही गुडघ्यापर्यंत पाणी तुंबले.

टंचाईमुळे दैनंदिन पाणीपुरवठय़ात घट करण्यात आल्याने शहरवासियांचे सध्या हाल चालू आहेत.  दुष्काळाच्या सावटाखाली वावरणाऱ्या शहरात पाण्याचा असा अपव्यय झाल्यामुळे परिसरात दैनंदिन पाणीपुरवठा झाला नसल्याच्या तक्रारी आहेत. संकट काळात पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर जबर दंड करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. त्यात पालिका अधिकारी, जलवाहिनीचे काम करणारे ठेकेदार यांचा समावेश आहे की नाही, याची स्पष्टता मात्र केलेली नाही. उपरोक्त घटनेत आदल्या दिवशी दुरुस्ती झालेल्या ठिकाणी वाहिनीचे झाकण निघाल्याने पाण्याचा अपव्यय झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या घटनेची चौकशी करून पालिका आपल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गंगापूर धरण तळ गाठण्याच्या मार्गावर असताना पाणीकपातीबाबत सुरुवातीपासून सुरू असणारा घोळ अद्यापपर्यंत कायम आहे. अलीकडेच त्यात पुन्हा बदल करण्यात आले. दैनंदिन १५ टक्के कपात सुरू ठेवून आता आठवडय़ातील एक दिवस म्हणजे गुरुवारी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणीबचतीसाठी सारे घटक आग्रही असताना सिडकोत त्या विपरीत घटना घडली. उत्तमनगरच्या मुख्य रस्त्याखालून जाणाऱ्या वाहिनीतून सकाळी सातच्या सुमारास प्रचंड दाबाने पाणी बाहेर येण्यास सुरुवात झाली. काही वेळातच आसपासच्या गल्ल्यांमधून पाण्याचे लोट वाहू लागले. हा भाग उताराचा असल्याने १० ते १२ घरांमध्ये पाणी शिरले. दैनंदिन पाणीपुरवठा धड होत असताना रस्त्यावरून वाहणारे पाणी पाहून नागरिक अचंबित झाले. दरम्यानच्या काळात या घटनेची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहिनीचे झाकण बसवून गळती थांबविली. परंतु १५ ते २० मिनिटात हजारो लिटर पाणी वाहून गेले. त्यामुळे सिडको महाविद्यालयाच्या मैदानास डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.ज्या ठिकाणी ही घटना घडली, तिथे आदल्या दिवशी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. त्यावेळी जलवाहिनीला झाकण बसविले गेले. सकाळी हवेच्या दाबामुळे हे झाकण उडाले आणि पाणी बाहेर आले. परंतु, काही मिनिटात ते झाकण बसवून गळती थांबविण्यात आल्याचा दावा या विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला. दुरुस्तीच्या कामावेळी झाकण योग्य पद्धतीने न बसविल्याने पाण्याचा अपव्यय झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला.

मागील आठवडय़ात खुद्द पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पाण्याच्या अपव्ययावर बोट ठेवत त्यावर नियंत्रण आणण्यासाठी संबंधितांना पाच ते दहा हजार रुपये दंड ठोठावण्याची गरज व्यक्त केली होती. त्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्याची तयारी प्रशासन करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. टंचाईच्या काळात पिण्याचे पाणी वाहन धुणे, बगिचाला देणे वा सडा मारण्यासाठी वापरले जाते. काही इमारतींमध्ये टाकी ओसंडून वाहात असते. नळांना तोटय़ा नसल्याने अपव्यय होतो. या स्थितीत पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तयारी करणारे प्रशासन आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून तसे काही घडल्यास तोच निकष लावणार काय, हा प्रश्न आहे. हजारो लिटर पाण्याची नासाडी होण्यास कारक ठरलेल्या घटकांची चौकशी करून कारवाईचे औदार्य पालिका दाखविणार का, हा नागरिकांचा प्रश्न आहे.

More Stories onनाशिकNashik
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water problem in nashik
First published on: 09-03-2016 at 03:04 IST