चारुशीला कुलकर्णी

‘धरण उशाशी..कोरड घशाशी’ या उक्तीचा प्रत्यय त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव येथील बडर्य़ाची वाडी ग्रामस्थ प्रत्येक उन्हाळ्यात घेत आहेत. हंडाभर पाण्यासाठी ९० ते १०० फुट खोल विहिरीत दोरीच्या मदतीने उतरण्याची कसरत त्यांना करावी लागते. पाण्यासाठी होणाऱ्या भटकंतीमुळे मुलांचे शिक्षण थांबले, गावात आरोग्याच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्र्यंबकेश्वर पंचायत समितीकडून आठवडय़ाला एक टँकर याव्यतिरिक्त ठोस अशी कोणतीच उपाययोजना केली जात नसल्याने गाऱ्हाणे कोणापुढे मांडायचे? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील टाकेदेवगाव येथील बडर्य़ाची वाडी हा आदिवासी पाडा असून पाडय़ातील बहुतांश लोक शेती व्यवसाय करतात. मात्र शेती ही केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने अन्य वेळी रोजगारासाठी स्थलांतर नित्याचे झाले आहे. बडर्य़ाची वाडी टाकेदेवगाव तसेच इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणापासून केंद्रस्थानी आहे. दोन किलोमीटरवर पाण्याचा साठा असला तरी गावात मात्र टंचाई पाचवीला पूजली आहे. गावातील विहीर पाण्याचा एकमेव स्रोत असून उन्हाळा सुरू झाला की विहीर आटते. आठ दिवसांतून गावात एकदा १० हजार लीटर पाण्याचा टँकर येतो. गावातील लोकसंख्या शंभरपेक्षा अधिक असल्याने टँकरचे पाणी त्यांना पुरेनासे झाले आहे. आटलेल्या विहिरीत येणारे पाणी उपसा करण्याकडे ग्रामस्थांचा कल असतो. पूर्णत कोरडय़ाठाक पडलेल्या विहिरीत कुठेतरी पाण्याचा अंश येताना दिसला की वाडीतील बायका, लहान मुले धाव घेतात. घरातील सर्व रिकामी भांडी भरण्यासाठी आटापिटा सुरू होतो. महिला दोरीच्या मदतीने विहिरीत उतरतात. पाणी मिळवण्यासाठी होणारी ही कसरत पाहाणाऱ्यांचा थरकाप उडवते.

विलाताई पारधी म्हणाल्या, बाई म्हणून घरातील कामे करायची की सारखं पाणी भरत राहायचे? असा प्रश्न सतावत आहे. विहिरीला पाणी लागत नाही, पण आमच्या डोळ्यांच्या कडा मात्र पाण्याने भरतात. सरकारी डॉक्टर लसीकरणाशिवाय गावात येत नाही. तर मुक्या जनावरांसाठीही पाणी नसल्याने गावातील पशुधन धोक्यात आले आहे. माणसांना पिण्यासाठी पाणी नाही तर जनावरांना कुठून आणणार? असा सवाल हरी पारधी यांनी उपस्थित केला.

प्रशासनाकडे आमच्यासाठी वेळ नाही

पिढय़ानपिढय़ा आम्ही पाण्यासाठी भटकंती करतो, पण प्रशासन, राजकारण्यांना आमची दया येत नाही. घरात पाणी नसल्याने दोन किलोमीटरवरील धरणावर अन्यथा दीड किलोमीटरवरील विहिरीकडे पाण्यासाठी जावे लागते. तीन ते चार दिवसांनी आंघोळ करतो. मुलांची शाळा थांबवली असून त्यांनाही पाणी आणण्यासाठी सोबत घेऊन जातो. संपूर्ण आयुष्य पाणी पाणी करत चालले आहे. जवळच्या धरणातून गावापर्यंत जलवाहिनी टाकल्यास पाण्याचा प्रश्न सुटेल. पण कोणीच याविषयी काहीच करायला तयार नाही.

– संजय पारधी (रहिवासी)