आठ धरणांमध्ये पाच टक्के जलसाठा

जूनच्या मध्यानंतरही पावसाची प्रतीक्षा करावी लागत असल्याने कोरडय़ा पडणाऱ्या धरणांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्य़ातील १६ धरणे कोरडी झाली आहेत. उर्वरित आठ धरणांमध्ये जेमतेम पाच टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच सुमारास केवळ सहा धरणे कोरडी होती. यंदा हे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. पाऊस आणखी लांबल्यास गंभीर स्थितीला तोंड द्यावे लागण्याची भीती आहे.

गेल्या वर्षी कमी पावसामुळे जिल्ह्य़ातील लहान-मोठय़ा २४ धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झालेला नव्हता. परिणामी दुष्काळात टंचाईच्या झळा अधिक तीव्रतेने सहन कराव्या लागल्या. धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये तब्बल १२०० गाव-वाडय़ांना ३८४ टँकरने पाणी पुरवावे लागत आहे. पावसाचे वेळेवर आगमन होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल ही अपेक्षा फोल ठरली आहे.

काही ठिकाणी मान्सूनपूर्व वादळी पावसाचा अपवाद वगळता मान्सूनचे आगमन झालेले नाही. परिणामी, तळ गाठलेल्या धरणांची संख्या वृद्धिंगत होत आहे. चोवीसपैकी सध्या केवळ आठ धरणांमध्ये जेमतेम पाणी आहे.

नाशिक शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये सर्वाधिक म्हणजे ९१५ दशलक्ष घनफूट अर्थात १६ टक्के पाणी आहे. काश्यपीमध्ये ९१ दशलक्ष घनफूट (पाच टक्के) आणि गौतमी गोदावरीत ६१ (तीन) जलसाठा शिल्लक आहे. पालखेडमध्ये १२७ (१९) ओझरखेड ५८ (तीन), दारणा ५१३ (सात), गिरणा १४५१ (आठ), पूनद ११ (एक) असा जलसाठा शिल्लक आहे.

यातील बहुतांश धरणांनी तळ गाठलेला आहे. काही ठिकाणी जिवंत साठय़ाचा उपसा किंवा वापर करणेही अवघड आहे. पावसाचे लवकर आगमन न झाल्यास त्यांचाही समावेश रिक्त धरणांच्या यादीत होईल.

वाढती यादी

एखाद्या वर्षांत इतक्या मोठय़ा संख्येने धरणे कोरडी पडण्याची ही कित्येक वर्षांतील पहिलीच घटना आहे. सहा ते सात धरणांनी एप्रिलमध्ये तळ गाठला होता. पुढील काळात त्यांची संख्या वाढत गेली. पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार आळंदी, करंजवण, वाघाड, पुणेगाव, तीसगाव, भावली, मुकणे, वालदेवी, कडवा, भोजापूर, नांदूरमध्यमेश्वर, चणकापूर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, माणिकपूंज ही १६ धरणे कोरडी पडली आहेत.

गतवर्षीच्या तुलनेत कमी जलसाठा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षी १९ जूनला जिल्ह्य़ातील धरणांमध्ये सात हजार ७५५ दशलक्ष घनफूट अर्थात १२ टक्के जलसाठा होता. यंदा हेच प्रमाण तीन हजार २५६ दशलक्ष घनफूट म्हणजे पाच टक्क्यांवर आले आहे. मागील वर्षी याच सुमारास केवळ सहा धरणे कोरडी होती. यंदा ही संख्या १६ धरणांवर गेली आहे.