धरणांमधील जलसाठा ८४ टक्क्यांवर; गोदावरीतून ४७ टीएमसी पाणी जायकवाडीकडे प्रवाहित

पावसाचा लपंडाव सुरू असताना ऑगस्टच्या प्रारंभीच जिल्ह्यातील नऊ धरणे तुडुंब भरलेली असून उर्वरित पाच धरणेही भरण्याच्या स्थितीत आहे.

धरणांमधील जलसाठा ८४ टक्क्यांवर; गोदावरीतून ४७ टीएमसी पाणी जायकवाडीकडे प्रवाहित
प्रतिनिधिक छायाचित्र

नाशिक : पावसाचा लपंडाव सुरू असताना ऑगस्टच्या प्रारंभीच जिल्ह्यातील नऊ धरणे तुडुंब भरलेली असून उर्वरित पाच धरणेही भरण्याच्या स्थितीत आहे. अन्य दारणा आणि गंगापूरसारख्या मोठय़ा व मध्यम धरणात जलाशय परिचालन सुचीतील वेळापत्रकानुसार जलसाठा करावा लागल्याने मुसळधार पाऊस होऊनही ती पूर्ण क्षमतेने भरता आली नाहीत. जिल्ह्यात सध्या ५५ हजार १६१ दशलक्ष घनफूट म्हणजे ८४ टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यातून ४७ टीएमसी पाणी गोदावरी नदीतून मराठवाडय़ाकडे प्रवाहित झाले आहे.

प्रारंभीच्या जून महिन्यात प्रतीक्षा करायला लावलेल्या पावसाने जुलैत सर्व कसर भरून काढली. १० ते १५ दिवस इतका पाऊस झाला की, नद्या, नाल्यांना पूर आला होता. अनेक तालुके जलमय झाले. अवघ्या काही दिवसात बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरण्याच्या स्थितीत आली. पावसाचा जोर नंतर कमी झाला. तूर्तास तो अधूनमधून हजेरी लावतो. पावसाला अद्याप दोन महिने अवधी आहे. तत्पूर्वीच जलसाठा लक्षणीय उंचावला आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार आळंदी, वाघाड, ओझरखेड,  तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही नऊ धरणे तुडूंब भरली आहेत. गौतमी गोदावरी (८४), काश्यपी (९४ टक्के), करंजवण (८१), मुकणे (९१). गिरणा (९०) ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.

मुसळधार पावसात काही मोठे व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले गेले असते. परंतु, कोणत्या महिन्यात धरणात किती जलसाठा ठेवायचा याचे वेळापत्रक असते. जलाशय परिचालन सूचीनुसार संबंधित धरणांमध्ये जलसाठा ठेवणे बंधनकारक आहे. त्यामुळे ती धरणे ३० ते ३५ टक्के रिक्त आहेत. यामागे अकस्मात पाऊस झाल्यास धरणात काही कालावधीसाठी पुराचे पाणी साठवण्यास जागा उपलब्ध राखण्याचे नियोजन आहे.

 नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात (७४ टक्के),  दारणा (७४), पालखेड (५४) मुख्यत्वे या धरणांमध्ये तसे नियोजन केलेले आहे. करंजवण (८१), पुणेगाव (७५). कडवा (८५), नांदूरमध्यमेश्वर (८२), चणकापूर (६२), पुनद (४६), नागासाक्या (१०) असा जलसाठा आहे. माणिकपूंज हे एकमेव धरण अद्याप कोरडेठाक आहे. जिल्ह्यातील लहान-मोठय़ा २४ धरणांची ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट इतकी जलसाठय़ाची क्षमता आहे. सध्या धरणांमध्ये ८४ टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण केवळ ५१ टक्के इतके होते. आजही आळंदी, वाघाड, ओझरखेड, दारणा, भावली, नांदूरमध्यमेश्वर, हरणबारी केळझर, गिरणा या धरणांमधून विसर्ग सुरू आहे. या हंगामात नांदूरमध्यमेश्वरमधून जायकवाडीकडे आतापर्यंत ४७ हजार २०५ दशलक्ष घनफूट म्हणजे तब्बल ४७ टीएमसी पाणी प्रवाहित झाले आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water storage in dams 47 tmc water flows jayakwadi ysh

Next Story
शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी