नाशिक : निर्यातबंदी, व्यापाऱ्यांना साठवणुकीस मर्यादा यामुळे गडगडल्याने विधानसभा निवडणूक प्रचारात ऐरणीवर आलेला कांदा मतदानानंतर मात्र पुन्हा भाव खात आहे. मागणी वाढल्याने लासलगाव बाजार समितीत कांद्याने एक हजार रुपयांनी उसळी घेतली. दक्षिणेकडील राज्यांत पावसामुळे कांद्याची आवक थांबली, नुकसान झाले. यामुळे नाशिकच्या कांद्याची मागणी अकस्मात वाढली. शनिवारी अडीच हजारावर असणारे प्रति क्विंटलचे सरासरी दर आता साडेतीन हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
महानगरांमध्ये कांद्याचे दर उंचावल्यानंतर केंद्र सरकारने गेल्या सप्टेंबरमध्ये निर्यातबंदी करीत व्यापाऱ्यांना साठवणुकीस मर्यादा घातल्या होत्या. जोडीला परदेशातून कांदा आयातीचा निर्णय घेतला गेला. या निर्णयामुळे हंगामात प्रथमच चार हजारांचा पल्ला गाठणारे दर घसरले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा विरोधकांनी लावून धरला. कांदा दरातील चढ-उताराला भाजपला जबाबदार धरत तसा प्रचारही केला गेला. कांद्यावरून विरोधकांनी रान उठविल्याने भाजपला काहीसा बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला. नाशिक येथील सभेत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच कांद्यावरील निर्यातबंदी हटविण्यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे आश्वासन द्यावे लागले.
मतदानाआधी म्हणजे शनिवारी कांद्याला सरासरी २५८० रुपये दर मिळाले होते. रविवारची साप्ताहिक सुटी आणि सोमवारी मतदान यामुळे सलग दोन दिवस बाजार समितीचे कामकाज बंद होते. तिसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी लासलगाव बाजारात ३६९४ क्विंटलची आवक झाली. त्यास किमान १२०१ ते कमाल ३७२५ आणि सरासरी ३५६० रुपये दर मिळाला. बुधवारी पाच हजार क्विंटलची आवक होऊन त्यास सरासरी ३४०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले. तीन दिवसांत दर हजार रुपयांनी उंचावले. यामागे दक्षिणेकडील राज्यांतील पाऊस हे कारण आहे. पावसामुळे त्या भागात कृषिमालाचे नुकसान झाले.
शिवाय तेथील बाजार बंद राहिल्याने आवकही थांबली. त्याची परिणती महाराष्ट्रातील कांद्याची मागणी वाढण्यात झाली. सध्या बाजारात चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा विक्रीला येत आहे. हा साठा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने आवक कमी झाली आहे. पावसामुळे या वर्षी नवीन कांदा बाजारात येण्यास विलंब झाला. नोव्हेंबरच्या अखेरीस तो बाजारात येईल. तोपर्यंत कांदा बाजारातही चढ-उतार कायम राहणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.
दक्षिणेकडील राज्यांत पावसामुळे कृषिमालाचे नुकसान झाले. तेथील बाजार बंद असल्याने कांद्याची आवक थांबली. नाशिकच्या कांद्याची मागणी वाढण्यामागे हे कारण आहे. दिवाळीत स्थानिक बाजार समित्या आठवडाभर बंद असतात. नोव्हेंबरमध्ये नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात होईल. त्याची आवक वाढल्यानंतर कांद्याचे दर कमी होऊ शकतात. – सुवर्णा जगताप (सभापती, लासलगाव बाजार समिती)