नाशिक : ऊसाने भरलेला ट्रॅक्टर अचानक मागे आल्याने काम करणाऱ्या ४५ वर्षांच्या ऊसतोड मजूर महिलेचा मृत्यू झाला. शिलापूर शिवारात हा अपघात झाला. मनिषा राठोड (नांदूरनाका, पोलीस चौकीसमोर) असे मृत महिलेचे नाव आहे. शिलापूर येथील उत्तम पेखळे यांच्या शेतात हा अपघात झाला. शेतात ऊसतोड सुरू असून मृत महिला अन्य मजुरांसमवेत ट्रॅक्टरमध्ये ऊसाची मोळी टाकत होती. यावेळी ट्रॅक्टर अचानक पाठीमागे आल्याने महिला ट्रॉलीच्या चाकात अडकली. चाक अंगावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. ठेकेदारासह अन्य मजुरांनी तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

घरात शिरुन मारहाण

वखारीतील मजुरांना शिवीगाळ केल्याच्या कारणातून दोन संशयितांनी एकास घरात शिरुन बेदम मारहाण केल्याची घटना वडाळा नाका परिसरात घडली. या प्रकरणी शोभा खानझोडे (नागसेननगर) या महिलेने तक्रार दिली. संशयित अमन कुरेशी आणि अफजल कुरेशी (नागसेननगर, वडाळानाका) या बापलेकांनी बळजबरीने घरात शिरून हे कृत्य केले. वखारीतील कामगारांना का शिवीगाळ केली या कारणावरून वाद घालून मुलगा अक्षयला बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोन संशयितांना अटक केली आहे.

रूग्णालयातून भ्रमणध्वनी, रोकड लंपास

खासगी दवाखान्यात नोकरी करणाऱ्या कर्मचारी महिलेचा भ्रमणध्वनी व रोकड चोरटय़ांनी लंपास केल्याची घटना जुने नाशिक परिसरातील तलावडी भागात घडली. या बाबत सोनी परदेशी (जुनी तांबट लेन) यांनी तक्रार दिली. परदेशी या तलावडी भागातील नसीम रुग्णालयात नोकरी करतात. नेहमीप्रमाणे त्या सेवा बजावत असताना चोरटय़ांनी त्यांच्या पर्समधील दोन भ्रमणध्वनी आणि रोकड असा सुमारे ३८ हजार ९०० रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.