डॉ. निलम गोऱ्हे यांचा इच्छुकांना सल्ला

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अनेकांना थेट नगरसेवक होण्याचे वेध लागले आहेत. तथापि, असे स्वप्न बघण्याआधी प्रथम संघटनेत येऊन काम करा. शिवसेना घराघरात पोहोचवा. संघटनेतील अनुभव घेऊन नगरसेवक वा सरपंच बघण्याची मनिषा बाळगा, असा सल्ला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिला.

बुधवारी शिवसेनेच्या शालिमार येथील कार्यालयात डॉ. गोऱ्हे यांनी शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा आढावा घेतला. यावेळी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, मनपाचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी व शिवसैनिक, महिला उपस्थित होत्या.

शिवसेनेत अनेक नवीन लोक येत आहेत. नवीन लोक आल्यामुळे जुन्या लोकांना आमचे काय असा प्रश्न पडतो. स्थानिक पातळीवर तसा प्रश्न नाही. पूर्वी पक्ष सोडून गेले होते, ते देखील परत येत आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी व नुकसान झाले आहे. त्यामुळे कार्यकर्ते त्रस्त आहेत. त्यांना कसे सावरायचे हा प्रश्न आहे. प्रत्येक जिल्ह्यात परिस्थिती वेगळी असते, असे त्यांनी सांगितले. शिवसेना महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संघटक दिवंगत सत्यभामा गाडेकर यांच्या जागी कोणाची नियुक्ती करायची, याबाबत पक्षश्रेष्ठी योग्य वेळी निर्णय घेतील, असे त्यांनी सूचित केले.

शालिमार परिसरात वाहनांची गर्दी

शिवसेना कार्यालयातील बैठकीला अनेक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. संबंधितांच्या वाहनाने शालिमार येथील सेना कार्यालयासमोरील रस्ता वाहनांनी भरून गेला. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडी झाली. शहरातील निर्बंध शिथील झाल्यामुळे बाजारपेठेतील दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत उघडण्यास मुभा आहे. सेना कार्यालयाच्या सभोवताली विविध दुकाने आहेत. मुख्य मार्गावर वाहनांची वर्दळ असते. वाहनांच्या गर्दीची झळ व्यापाऱ्यांसह वाहनधारक व पादचाऱ्यांना बसली.