राम-विशाल जोडीची समाजसेवा
नांदगाव : करोना महामारीने लोकांमधील वेगवेगळ्या स्वभावाचे दर्शन होत आहे. रुग्ण बाधित झाल्याची माहिती मिळाल्यावर तर रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर पुढील कार्यवाहीपर्यंत नातेवाईकांचे अंतर राखणे असो, किं वा रुग्णाकडे करण्यात येणारे दुर्लक्ष असो. बदलत्या मानवी स्वभावामुळे सर्वच चकित होत असताना नात्याचे नसतानाही काही जणांकडून रुग्णांची होणारी सेवा दिलासादायकच म्हटली पाहिजे. नांदगाव तालुक्यातील राम शिंदे आणि विशाल जाधव या युवकांकडून होणारी रुग्णसेवा त्यामुळेच सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
करोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर रुग्णाच्या अंत्यविधीसाठी नातेवाईकांना जवळ येऊ दिले जात नसल्याने मध्यरात्र असो किं वा पहाट असो. अंत्यसंस्कार करण्यासाठी राम शिंदे आणि विशाल जाधव हे दोन्ही युवक पुढे सरसावतात. त्यांच्याकडून होणारी ही सेवा अर्थातच विनामूल्य. नांदगाव तालुक्यात सध्या करोनाने थैमान घातले असून उपचाराला प्रतिसाद न देणाऱ्या अनेक रुग्णांचा मृत्यू होत आहे. कधी प्राणवायूची पातळी खालावल्याने, तर कधी अनेक शारीरिक व्याधी असलेले करोनाबाधित रुग्ण नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. दाखल झाल्यानंतर डॉ. रोहन बोरसे यांच्याकडून रुग्णांवर उपचार के ले जातात. परंतु उपचारास प्रतिसाद न मिळून काही रुग्णांचा मृत्यू होतो.
मृत्यूनंतर ग्रामीण रुग्णालयात सुरक्षा रक्षक असलेले राम शिंदे आणि रुग्णवाहिकाचालक विशाल जाधव या दोघांचे काम सुरू होते. दोघे अंत्यसंस्काराची सर्व प्रक्रिया पार पाडतात. नातेवाईकांना स्मशानभूमीत तयारी करायला लावल्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे करोनाबाधिताचा मृतदेह स्मशानभूमीत घेऊन जातात. स्वत: अंत्यसंस्कारासाठी आणलेली लाकडे रचून त्यावर अंत्यसंस्कार करतात. या कामासाठी हे दोघे कधीही, कोणतीही वेळ पाहत नाहीत. नातेवाईक सांगतील त्या वेळेला अंत्यसंस्कार करायला तयार असतात. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना ते पैसेही घेत नाहीत. केवळ समाजकार्य म्हणून त्याकडे ते बघतात.
आतापर्यंत राम आणि विशाल या जोडीने मूळडोंगरी, जामदरी, साकोरा, वेहेळगाव, जळगाव बुद्रुक, नागापूर, मनमाड, दहेगाव, कासारी, भालूर आदी ठिकाणी ५० पेक्षा अधिक करोनाबाधितांवर अंत्यसंस्कार केले आहेत. ग्रामीण रुग्णालयात सुरक्षा रक्षक असलेला राम हा आपली नोकरी सांभाळून करोना रुग्णांची सेवा करत रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देण्याचेही काम करीत असतो. विशाल हा रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना ने-आण करण्याचे काम करतो. ज्या रुग्णांना जवळचे नातेवाईक नसतात, अशा रुग्णांसाठी जेवणाची व्यवस्थाही राम आणि विशाल उपलब्ध करून देतात. आपल्या या अनोख्या समाजसेवेमुळे राम आणि विशाल ही जोडी नांदगाव तालुक्यात प्रसिद्ध झाली आहे.