नाशिक : श्वानाचे संगोपन शास्त्रीय पद्धतीने कसे करावे, या संदर्भात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने श्वानपालक प्रमाणपत्र’ हा नव्याने सुरू केलेला शिक्षणक्रम वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुक्त विद्यापीठात पशू वैद्यकीय शाखा नाही. त्यासंबंधी तज्ज्ञ नाहीत. असे असताना कृषी विज्ञान विद्या शाखेकडून हा पदविका अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे. मागणी नसणारे अभ्यासक्रम सुरू करून विद्यापीठाचे लाखो रुपये नाहक खर्च होत असल्याचा आक्षेप घेतला जात आहे.

कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून मुक्त विद्यापीठाने श्वान संगोपनासाठी श्वानपालक प्रमाणपत्र’ हा अभिनव शिक्षणक्रम सुरू केला आहे. तो श्वान प्रशिक्षण, पालन-पोषण आणि संगोपनावर आधारित आहे. त्यास ऑनलाईन प्रवेश घेण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. या शिक्षणक्रमात श्वानांच्या विविध जाती, त्यांच्या गरजा, त्यांना काय खायला द्यावे, आरोग्याची काळजी कशी घ्यावी, हे शिकवले जाईल. श्वानांना शिस्त लावणे, श्वानपालनाचे नियम आणि कायदेशीर बाबींबद्दलही मार्गदर्शन केले जाईल. श्वानांवर प्रेम करणाऱ्यांसाठी ही एक नवी करिअरची संधी ठरू शकते. श्वानपालक प्रमाणपत्र हा एक वर्षाचा शिक्षणक्रम आहे, ज्यामध्ये एकूण ४८ तात्विक तासिका आणि २४ प्रात्यक्षिके (प्रत्येकी दोन तासांची) असतील. विशेष म्हणजे, सर्व तासिका आणि प्रात्यक्षिके शनिवार-रविवार घेतली जातील, ज्यामुळे नोकरी किंवा इतर कामे करणाऱ्यांसाठीही हा शिक्षणक्रम सोयीचा ठरेल. पशुवैद्यकीय तज्ज्ञ हे वर्ग घेणार असल्याचे मुक्त विद्यापीठाने म्हटले आहे.

या नव्या अभ्यासक्रमावर मुक्त विद्यापीठाच्या विद्वत परिषदेचे माजी सदस्य प्रा. डॉ संजय खडक्कार यांनी आक्षेप घेतला आहे. मागणी नसणारा हा वर्षभराचा शिक्षणक्रम सुरू करून मुक्त विद्यापीठ काय साध्य करणार, असा प्रश्न त्यांनी केला.Y विद्यापीठाकडे पशू वैद्यकीय शाखा व त्यासंबंधी तज्ज्ञ नसताना कृषी विज्ञान विद्या शाखेकडून तो राबविण्यात येणार आहे. मुळात विद्यापीठ अनुदान आयोगाने मुक्त विद्यापीठांना व्यावसायिक अभ्यासक्रम चालविण्यासाठी बंदी केलेली आहे. त्यात अभियांत्रिकी, वास्तूविशारद, वैद्यकीय शाखांचा समावेश आहे. त्याचबरोबर कृषीची पदवी बी.एस.सी. (कृषी) हा अभ्यासक्रम चालवण्यासही मनाई केली आहे, याकडे डॉ. खडक्कार यांनी लक्ष वेधले. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार या अभ्यासक्रमास १४ हजार रुपये शुल्क आहे.

खर्च कुणासाठी ?

श्वान संगोपन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी एक तर लाखो रुपये खर्च केले गेले व दुसरीकडे या अभ्यासक्रमाला अत्यल्प विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची साशंकता डॉ. खडक्कार यांनी व्यक्त केली. असे मागणी नसलेले पदविका अभ्यासक्रम सूरू करून नुसते विद्यापीठाचे लाखो रुपये खर्च होतात, आणि त्यातून फक्त अभ्यासक्रम तयार करण्यासाठी आलेल्या तज्ज्ञांचा व शिक्षकांना आर्थिक फायदा होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.