मालेगाव : मारक्या बैलाला घाबरून स्वतःचा बचाव करताना विहिरीत पडलेल्या तरुणाला वाचविण्यासाठी बैल मालकाने विहिरीत उडी मारली. परंतु, या तरुणाने बैल मालकाला पाण्यात घट्ट मिठी मारल्याने नाईलाज झाला आणि दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. मालेगाव तालुक्यातील अस्ताने येथे ही दुर्दैवी घटना घडली. गणरायाच्या स्थापनेसाठी सर्वत्र लगबग सुरू असतानाच बुधवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे पंचक्रोशीतील गणेशोत्सवावर दुःखाचे सावट पसरले.

गोरख देवसिंग देवरे (५१) व नीलेश राजेंद्र देवरे (२२) असे मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. गोरख देवरे हे जळकु शिवारातील शेतात काम करीत होते. त्यावेळी शेजारच्या शेतामधील नीलेश हा तरुण शेतकरी काही तरी वस्तू घेण्यासाठी त्यांच्या शेतात गेला. गोरख यांच्या शेतातील विहिरीजवळ त्यांचे दोन बैल चरत होते. त्यातील एक बैल मारका असल्याने त्याच्या जवळून जाऊ नको, असे गोरख यांनी सुचविले. त्यामुळे या विहिरीच्या काठावरील पायवाटेने निघालेला नीलेश बैलापासून दूर जाऊ लागला. त्यावेळी निसरड्या वाटेवरून घाईघाईत जाण्याच्या प्रयत्नात पाय घसरून तो थेट विहिरीत पडला.

गोरख हे विहिरीपासून जवळच होते. त्यांना पोहण्याची कला चांगली अवगत होती. त्यामुळे नीलेश विहिरीत पडल्याचे बघताच त्याला वाचविण्यासाठी क्षणाचाही विचार न करता त्यांनी विहिरीत उडी घेतली. नीलेश याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात गटांगळ्या खात होता. यावेळी त्याने वाचविण्यासाठी आलेल्या गोरख यांना घट्ट मिठी मारली. त्यामुळे पोहता येत असूनही गोरख यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. त्याची परिणती या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू होण्यात झाली.

या विहिरीला जवळपास २५ फूट पाणी होते. गोरख देवरे यांच्या पत्नी या देखील शेतात काम करीत होत्या. नीलेशला वाचविण्यासाठी पतीने विहिरीत उडी मारल्यावर उद्भवलेल्या बाका प्रसंगाची त्यांना कल्पना आली. त्यामुळे त्यांनी मोठमोठ्याने आवाज दिला. त्यानंतर आजूबाजूचे शेतकरी व गुराखी घटनास्थळी धावून आले. उपस्थित लोकांनी बचाव कार्य सुरू केले, मात्र यात बराच वेळ गेल्याने दोघांना वाचविण्यात यश येऊ शकले नाही.

दोघांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर मालेगावच्या सामान्य रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. गुरुवारी अस्ताने येथे एकाच वेळी दोघांच्या पार्थिवांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. बुधवारी दुपारनंतर भक्तमंडळी गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाली होती. लाडक्या गणरायाच्या आगमनाच्या निमित्ताने उत्साह ओसंडून वाहत असतानाच दोघांचा मृत्यू झाल्याची वार्ता सायंकाळी गावात येऊन धडकल्याने शोककळा पसरली. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.