नवी मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून रविवारी ११५ नवे रुग्ण सापडले असून एकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण करोना बाधितांची संख्या २८८६ झाली असून मागील काही दिवसापासून प्रत्येक दिवशी शंभरापेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत.

करोना संशयितांसाठी ‘पनवेल इंडिया बुल’ येथील व्यवस्थेबाबत व शिक्षण विभागातील कामातील हलगर्जीपणाबद्द्ल पालिकेचे उपायुक्त नितीन काळे यांना आयुक्तांनी नोटीस बजावली असून ३ दिवसांत खुलासा करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत.

एकीकडे सगळीकडे ‘मिशन बिगिन अगेन’चा तिसरा टप्पा सोमवारपासून सुरु होत असताना शहरात मागील काही दिवसांपासून एका दिवसात शंभरापेक्षा अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. मुंबईत करोनाचा कहर दिवासागणिक वाढत असून आज ११५ नवे रुग्ण सापडले तर एकाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शहरात आज ४१ जण करोनामुक्त झाल्याने नवी मुंबईतील करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,७१८ झाली आहे.

शहरात आज सापडलेल्या ११५ रुग्णांमध्ये बेलापूरमध्ये ५, नेरुळमध्ये १५, वाशीत १७, तुर्भेत सर्वाधिक २८, कोपरखैरणेत १७, घणसोलीत ९, ऐरोलीत २१, दिघ्यात ३ नवे रुग्ण आढळले आहेत. एकीकडे शहरात दररोज करोनाबाधितांचा आकडा वाढत असून अद्याप ४१५ जणांचे करोना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत.