विकास महाडिक

सिडकोच्या शिल्लक घरांसाठी पाच दिवसांत ४० हजार अर्ज

खारघर, कळंबोली, तळोजा, पनवेल, कामोठे, द्रोणागिरी या नवी मुंबईच्या दक्षिण भागात सिडकोने मोठय़ा प्रमाणात सुरू केलेल्या गृहनिर्मितीने खासगी विकासकांच्या बांधकामांवर गडांतर आले आहे. सिडकोच्या अल्प उत्पन्न गटातील घरांना मिळणारा प्रतिसाद पाहता खासगी विकासकांनीही या क्षेत्रात परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प सुरू केले आहेत. सिडकोची  परवडणारी घरे सोळा लाख रुपये किमंती पासून सुरू होत आहेत. या दरापेक्षा कमी दर ठेवण्याचा प्रयत्न खासगी विकासक करीत आहेत.

सिडकोने मागील वर्षांपासून अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे बांधण्यास प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. त्यात केंद्र सरकारने सिडको व म्हाडा यांना पाच लाख घरे बांधण्याचे लक्ष दिले आहे. त्यामुळे सिडकोने १५ हजार घरांची यशस्वी सोडत काढल्यानंतर लगेच आणखी ९० हजार घरांची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीच्या १५ हजार घरांपैकी शिल्लक एक हजार १०० घरांसाठी २४ जानेवारीपर्यंत ४०  हजार अर्ज आलेले आहेत. त्यात येत्या सहा दिवसात दुप्पट भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही वाढ २० पट असणार आहे. यापूर्वी केवळ १५ हजार घरांच्या सोडतीला एक लाख ९१ हजार अर्ज आलेले होते. सिडकोच्या घरांना मिळणारा प्रतिसाद पाहता सिडकोने महा गृहनिर्मितीला प्राधान्य दिले आहे. गेल्या ४८ वर्षांत सिडकोने केवळ एक लाख ३० हजार घरे बांधलेली असून या दोन वर्षांत एक लाख ५ हजार घरांचे लक्ष पूर्ण ठेवण्यात आले आहे. ही गृहप्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण होणार असून आणखी गृहप्रकल्प जाहीर होण्याची शक्यता आहे. सिडकोने यापूर्वी भूखंड विक्रीकडे लक्ष दिल्याने खासगी विकासकांचे चांगभलं झाल्याचे दिसून येत आहे. हे धोरण जाणीवपूर्वक तयार केल्याचे दिसून येते. त्यामुळेच मागील ४० वर्षांत केवळ सव्वा लाख घरांचा टप्पा सिडको गाठू शकलेली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाने सिडकोने परवडणाऱ्या घरांचा सपाटा सुरु केल्याने खासगी विकासकांची पंचाईत झाली आहे. त्यांच्या व्यवसायावर गंडांतर आले असून सुमारे २७ हजार घरे विक्रीविना पडून आहेत. त्यात सिडकोच्या महागृहनिर्मितीच्या धमाक्यापासून गेल्या वर्षीपासून विकासकांच्या गृहविक्रीवर २० ते ३० टक्के परिणाम झाला असल्याचे विकासक मान्य करीत आहेत. सिडकोच्या निकृष्ठ घरांबद्दल यापूर्वी अनेक तक्रारी होत्या. त्यामुळेच वाशीतील घरांची पुर्नबांधणी करण्याची वेळ रहिवाशांवर आलेली आहे. त्यासाठी सरकारने वाढीव अडीच चटई निर्देशांक जाहीर केला आहे. महारेरामुळे सिडकोच्या घरांनादेखील नोंदणी करून परवानगी घ्यावी लागली असून घरे वेळेत व चांगले बांधकाम देण्याची हमी द्यावी लागत आहे. त्यामुळे सिडकोच्या निकृष्ट घरांचा प्रश्न निकाली लागल्याने या घरांनाही मागणी वाढली आहे. सिडकोची घरे नवी मुंबईच्या दक्षिण भागात मोक्याच्या ठिकाणी तयार होणार आहेत. ९० हजार घरांसाठी तर ट्रक टर्मिनल, रेल्वे स्थानके, आणि बस स्थानके अशी मोक्याच्या भूखंडांचा सिडको शोध घेत असून रहिवाशांचा प्रवास खर्च वाचणार आहे. या घरात अल्प उत्पन्न गटातील ३६ हजार घरे आहेत. खासगी विकासकांनी या सिडकोच्या क्षेत्राबाहेर नैना क्षेत्रातील जमिनी घेऊन गृहप्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे मात्र या घरांची मागणी घटल्याने विकासकांची पंचाईत झालेली आहे. सिडकोची घरे घेणारा वर्ग वेगळाच असल्याचे काही विकासकांचे मत आहे, पण या महागृहनिर्मितीचा फटका विकासकांना बसल्याचे मान्य केले जात आहे.

सिडकोच्या घरांना येणारी मागणी ही लक्षवेधी आहे. गेल्या वर्षी काढण्यात आलेल्या सोडतीला १३ पट मागणी होती, तर शिल्लक घरांसाठीही चांगला प्रतिसाद असून ही २० पट मागणी आहे. यंदा ९० हजार घरांची सोडत निघणार आहे. त्यामुळे अनेक जण ही घरे घेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सिडकोवरील विश्वास ग्राहकांचा आजही कायम आहे. त्यामुळे खासगी विकासकांच्या विक्रीवर परिणाम हा झालेला आहे.

-लक्ष्मीकांत डावरे, पणन व्यवस्थापक, सिडको

सिडकोच्या महागृहनिर्मितीमुळे खासगी विकासकांच्या विक्रीवर परिणाम झालेला आहे ही बाब नाकारता येत नाही. मात्र सिडकोचे व विकासकांचे ग्राहक हे वेगळे आहेत. सिडकोच्या या निर्मितीमुळे खासगी विकासकांनीही परवडणाऱ्या घरांच्या बांधणीकडे मोर्चा वळविला आहे. .महागृहनिर्मितीने विकासकांचा विक्री वर २० ते ३० टक्के परिणाम झालेला आहे.

-अश्विन रुपारेल, सल्लागार, रियल इस्टेट, नवी मुंबई</p>