तीन आरोपींना अटक; चोरीचे ६४ गुन्हे उघडकीस

नवी मुंबई : नवी मुंबई गुन्हे शाखेने दुचाकी चोरणाऱ्या तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ६४ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून १ कोटी ३० हजार रुपयांच्या ४४ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. केवळ पंधरा ते वीस सेकंदांत आरोपी दुचाकींचे इग्नीशन लॉक तोडून ते नवीन बसवत चोरी करीत असे.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपिनकु मार सिंह यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली असून या संदर्भात दुचाकी (बुलेट) उत्पादन करणाऱ्या कंपनीला गाडीतील या त्रुटींबाबत कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींकडून नवी मुंबईतून चोरी झालेली एक कार आणि ११ दुचाकी, ठाणे येथील १४, पिंपरी चिंचवड १२, मुंबई ३, पुणे शहर, ग्रामीण व अहमनगर येथील प्रत्येकी १, याशिवाय सूत्रधार अमोल याने केलेल्या अन्य १८ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

सोहेल इम्तियाज शेख, सौरभ कारंजे आणि अमोल ढोबळे अशी आरोपींची नावे आहेत. मागील तीन ते चार महिन्यांपासून शहरात या दुचाकींच्या चोरीचे प्रकार वाढले होते. यासाठी नेमलेले पथक तांत्रिक तपासाअंती आरोपींपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. आरोपी वाशी सेक्टर १७ येथे असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांनी चार पथके करीत सापळा रचून सोहेल आणि सौरभ या दोघांना अटक केली. तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल याला महापे येथील सावली बारमध्ये अटक केली असून तोच या चोरीचा सूत्रधार आहे. त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे करण्याची पद्धत

आरोपी चोरीच्या कारमधून दुचाकी चालकावर पाळत ठेवत असत. या दुचाकीचे  हॅण्डल लॉक आणि गाडी सुरू करण्याचे इग्नीशन हे वेगवेगळे असते. हॅण्डल लॉक करावयाचे असल्यास हॅण्डलनजीक असलेले

कुलूपही लावावे लागते. हे टाळण्यासाठी अनेकदा हे चालक हॅण्डल लॉक न करता निघून जातात. याचा फायदा ही टोळी घेत असे. अगदी पंधरा ते वीस सेकंदांत इग्नीशन लॉक तोडून ते नवीन बसवत व गाडी घेऊन पसार होत असत.

बनावट कागदपत्र

चोरी केलेल्या दुचाकी या विविध जिल्ह्यांतील असून ज्या ठिकाणी चोरी केले तेथे त्या आरोपी विकत नसत. यासाठी संगणकावर सोहेल हा आरोपी बनावट आरसी बुक व इतर कागदपत्र हुबेहूब बनवत चोरीच्या बुलेट ४० ते ६० हजारांत विकत असत. या गाड्या विकत घेणाऱ्यांना आमचे गॅरेज आहे किंवा बँक रिकव्हरी असल्याने स्वस्तात विकत असल्याचे सांगत असत.