बकरी ईद, गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन

नवी मुंबई : करोनामुळे या वर्षीही बकरी ईद व गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. नवी मुंबई महापालिकेने तसे आवाहन केले असून यासाठी निर्बंध लागू केले आहेत.

बकरी ईद साजरी करताना परंपरेनुसार जनावरांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे; परंतु करोना संसर्गामुळे अत्यंत साधेपणाने हा सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे. सर्वत्र सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी असल्याने घरीच नमाज अदा करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन पद्धतीने जनावरे खरेदी करता येणार आहेत; परंतु

नागरिकांनी शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.  गणेशोत्सव साजरा करताना संबंधित विभागांची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारची मंडप उभारणी करू नये. तसेच केवळ अर्ज दाखल केल्यामुळे परवानगी मिळेल असे गृहीत धरण्यात येऊ  नये. रीतसर परवानगीशिवाय मंडपाची उभारणी सुरू करू नये. मंडप दिलेल्या नियमावलीतच असावेत. अन्यथा मंडपांवर निष्कासनाची कार्यवाही करण्यात येणार आहे.

नियमावली

  •  उत्सवासाठी परवानगी आवश्यक
  • सार्वजनिक मंडळासाठी गणेशमूर्ती ४, तर घरगुती गणपतीसाठी मूर्ती २ फूट असावी.
  • विसर्जनावेळी गर्दी टाळावी.
  • सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबीर तसेच प्रतिबंधात्मक जनजागृती उपक्रम घ्यावेत.
  • ध्वनिप्रदूषण होणार नाही याची खबरदारी घ्यावी.
  •  दर्शनासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करावी.
  •  ‘श्रीं’च्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ  नयेत.
  • विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

करोनाच्या  तिसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावाच्या शक्यतेने पालिका अधिक खबरदारी घेत आहे. बुधवारी साजरी करण्यात येणारी ईद तसेच पुढील काळात येणारा गणेशोत्सव या सणांबाबत पालिकेने दिलेल्या नियमावलींचे सर्वच नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. ‘आपले शहर आपली जबाबदारी’ या भावनेतून अत्यंत साधेपणाने व नियमांच्या चौकटीत हे सण साजरे करावेत. आपली व आपल्या कुटुंबाची तसेच समाजाची काळजी घेण्याचा प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करून प्रशासनाला सहकार्य करावे.

– दादासाहेब चाबूकस्वार, उपायुक्त , महापालिका