पालिकेचा आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार; थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नवी मुंबई : ऐरोलीतील पालिका रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी करोना प्रतिजन चाचणी केली असता ती नकारात्मक आली. मात्र पाच दिवसांनंतर त्यांना नेरुळ येथील रुग्णालयातून डॉक्टरांनी संपर्क साधत तुमचा तपासणी अहवाल सकारात्मक आला आहे. तुम्हाला पालिका रुग्णालयात तात्काळ दाखल व्हावे लागेल अशी सक्ती केली. याची सविस्तर माहिती  घेतली असता त्यांनी कोणतीही आरटीपीसीरआर तपासणी केलेली नव्हती. तर याचा कोणताही अधिकृत अहवाल पालिका आरोग्यविभागाकडे नसतानाही त्यांना   त्यांना ही सक्ती होत असल्याचे उघड झाले आहे.

ऐरोली सेक्टर सहामधील रहिवासी सोपान आढाव यांच्याबाबत हा प्रकार घडला असून त्यांनी पालिका आरोग्य विभागाची थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहेत.

आढाव यांनी ही सर्व हकीगत समाज माध्यमावर प्रसारित केल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराची चर्चा नवी मुंबईत सुरू आहे.खासगी डॉक्टर आणि पालिकेचा आरोग्य विभाग यांचे काही साटेलोटे आहेत का? अशी शंका घेण्यास वाव असल्याचा आरोप आढाव यांनी केला आहे.

९ ऑक्टोबर रोजी आढाव यांचे ऐरोलीतील कौटुंबिक डॉक्टर अरुण औटी यांनी त्यांना करोना तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आढाव यांनी सेक्टर तीनमधील जिजामाता रुग्णालयात प्रतिजन चाचणी करून घेतली. तो अहवाल नकारात्मक आल्यानंतर आढाव यांनी आणखी काही तपासण्या करण्याची आवश्यकता आहे का? अशी विचारणा केली. त्यावेळी तुम्हाला कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याने अतिरिक्त तपासण्या करण्याची गरज नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. करोना तपासणी अहवाल नकारात्मक आल्याने सुटकेचा नि:श्वास टाकलेल्या आढाव यांनी तो अहवाल आपले कौटुंबिक डॉक्टर औटी यांना दाखविला. त्यावेळी औटी यांनी खासगी प्रयोगशाळेत तपासण्या करून घ्या असा सल्ला दिला. मात्र आढाव यांनी डॉक्टरांचा सल्ला न जुमानता घर गाठले. दोन दिवसांनी रबाळे नागरी आरोग्य केंद्राच्या डॉक्टर नलिनी क्षीरसागर यांचा दूरध्वनी आढाव यांना आला. तो आढाव यांना धक्का देणारा होता. आपण करोनाबाधित असून तात्काळ रुग्णालयात दाखल व्हा असा आदेशच डॉ. क्षीरसागर यांनी दिला. आढाव यांनी पालिकेत स्व्ॉब टेस्ट केलेली नसताना त्यांचा अहवाल सकारात्मक कसा आला याचे आश्चर्य वाटले. आढाव यांना ही बाब समजावून न सांगता डॉ. क्षीरसागर यांनी अतिशय उद्धटपणे वागणूक दिल्याचे आढाव यांनी पत्रात म्हटले आहे. करोनाबाधित आल्याने अहवाल मागवून घेतला. आमच्याकडे तुमचा अहवाल नाही. त्यामुळे तो तुम्हाला देऊ शकत नाही. तुम्हाला रुग्णालयात दाखल व्हायचे आहे की नाही एवढेच स्पष्ट सांगा असा दम डॉ. क्षीरसागर यांनी दिला. आढाव यांनी पालिकेच्या दुसऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधून हा अहवाल मिळविला. तो अहवाल नेरुळ येथील पालिकेच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयाचा होता. पालिकेने या ठिकाणी अद्ययावत प्रयोगशाळा सुरू केली आहे. त्या रुग्णालयात किंवा ऐरोली येथील पालिका रुग्णालयात स्व्ॉब तपासणी केलेली नसताना अहवाल सकारात्मक आला कसा असा प्रश्न आढाव यांना पडला आहे. आढाव यांनी अहवालाची खातरजमा करण्यासाठी ऐरोली सेक्टर तीनमधील पालिका रुग्णालय पुन्हा गाठले. डॉक्टरांनी नंतर घूमजाव केले. डॉ. क्षीरसागर यांनी कोणत्या आधारावर तुमचा अहवाल बाधित दिला ते आता त्यांनाच विचारा असे सांगून हात वर केले. तेव्हापासून आढाव एका मानसिक दडपणाखाली वावरत आहेत.

ऐरोलीतील आढाव यांची अशी कोणतीही तक्रार अद्याप आपल्यापर्यंत आलेली नाही. ती प्राप्त झाल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.

– संजय काकडे, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई पालिका