ऐरोली परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना रिक्षा युनियनचे बेकायदा रिक्षा थांबे उभे राहिले आहेत. मिळेल त्या चौकात आणि रेल्वे स्थानक परिसरात गर्दीच्या ठिकाणी या युनियनने आपले बस्तान मांडल्याने प्रवासी आणि पादचाऱ्यांना वाहतूक कोंडीमुळे अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे ऐरोलीतील एकूण २० सेक्टरमध्ये तब्बल १२ पेक्षा अधिक बेकायदा रिक्षा थांबे उभे राहिले असून त्यावर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
ऐरोली परिसरातून मुंबई, ठाण्याकडे ‘शेअर रिक्षा’ त्याचबरोबर ऐरोली अंतर्गत वाहतूक करण्यासाठी मीटरच्या रिक्षा आहेत. ऐरोली स्थानक परिसरात पूर्व आणि पश्चिमेकडे जुने दोन रिक्षा थांबे आहेत. स्थानक आगार परिसरात बेकायदा दोन तर सेक्टर ५ सहकार बाजार, पेट्रोल पंप सिग्नल नजीक, सेक्टर १७ परिसरात वेलकम शॉपनजीक, दिवा सर्कज ब्रिजखाली, ऐरोली नाका परिसर तसेच ठाणे- बेलापूर मार्गावरील ऐरोली स्थानकानजीक पदपथावर, माइंड स्पेस, अक्षरा कंपनीजवळ विनापरवाना रिक्षा थांबे उभारले आहे.
नवी मुंबईतील राजकीय नेत्यांचे फलक लावून रिक्षाचालकांनी पदपथ आणि रस्त्यावर अतिक्रमण करत हे थांबे उभारले आहेत. ऐरोलीतील अंतर्गत वाहतुकीला यामुळे गर्दीचा अधिक सामना करावा लागत आहे. तर ठाणे-कळवा परिसरातील अनेक रिक्षाचालक जादा पैशांच्या अमिषापोटी नियम डावलून ऐरोली परिसरात बिनधोकपणे रिक्षा चालवत आहेत. मागील काही वर्षभरात वाढत्या रिक्षा स्टॅण्डमुळे मोठय़ा प्रमाणावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. त्यांच्या मनमानी पाìकगमुळे सर्वसामान्य नागरिकांना चालणे देखील कठीण झाले आहे. हे रिक्षाचालक किमान प्रवासी भाडे न आकरता मनमानी भाडे आकारून प्रवाशांची लूट करत आहेत. आरटीओ आणि वाहतूक पोलीस रिक्षाचालकांकडे नियमानुसार गणेवश नसतानासुद्धा कारवाई करत नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे.

मनमानी भाडेवाढ
ऐरोली परिसरातील रिक्षाचालकांनी डिझेलचे भाव वाढल्याचे कारण पुढे करत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षाचालकांनी देखील यात आपले हात ओले करत किमान आठ रुपये असणारे भाडे दहा रुपयांवर नेले आहे. मुकुंद कंपनी ते सेक्टर ५ परिसरात १० रुपये असणारे भाडे वाढवून १५ रुपये आकारले जातात. तर ४ ते ५ प्रवासी घेऊन रिक्षाचालक आरटीओचे कोणतेही नियम न जुमानता प्रवाशांची लूट करत आहे.

माहिती मागवून पुढील आठवडय़ात आरटीओच्या विशेष पथकांकडून रिक्षाथांब्यांवर त्याचबरोबर आरटीओचे नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येईल.
-संजय धायगुडे, नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन आधिकारी